पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशोकाच्या राज्यकारभाराचे विस्तृत वर्णन या खंडात केले गेले आहे. अशोकाच्या सुधारणा, स्तूप निर्माण, शिलालेख, राज्यकारभार, भाषा, धर्मप्रसार, विदेश संपर्क यांची विस्तृत माहिती लेखक आपणास या खंडात देतो. मध्यपूर्व आशियात भारताची मुद्रा सम्राट अशोकाने उठवून भारतीय उपखंडाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदवले हे सांगण्यालाही मुक्तिबोध विसरत नाहीत.


८. भारतीय सुवर्णयुगाची प्रभा


 गुप्त काळास भारतीय इतिहासात सुवर्णयुगाची संज्ञा का लाभली हे ज्यांना समजून घ्यायचे आहे. त्यांनी ‘भारत : इतिहास और संस्कृति'चे हे प्रकरण वाचायलाच हवे. या काळात शांती, संरक्षण, सुख, समृद्धीची नवी शिखरं सर केली. मानवाच्या सर्जनशीलतेचा चरम विकास आपणास या काळात आढळतो. गणित, तत्त्वज्ञान, कला, व्यापार सर्वच क्षेत्रांचा हा उत्कर्ष काळ! नावीन्य अनुकरण करत ते जीवन बनवण्याची किमया केली याच काळानी. वराहमिहिर आणि ब्रह्मगुप्ताचे, आर्यभट्टाचं शास्त्र विकसित होऊन जगास शून्याची महान देणगी गुप्त युगानेच दिली. कालिदासाचं ‘मेघदूत', 'रघुवंश' काव्य, नाटकाच्या मोहिनीचे हेच युग.

 ‘पंचतंत्र', 'हितोपदेश' विष्णुशर्मांनी लिहिले तो हाच काळ. संगीत, शिल्प कलेचा हा सुवर्णकाळ, व्यापार, उदीम वधारला याच वेळी. धर्म, संस्कृती, विद्या, तत्त्वज्ञानास सुगीचे दिवस याच युगाने पहिले. हा भाग वाचताना आपण स्वप्नात तर नाही ना, असं वाचकाला वाटणं हा गजानन माधव मुक्तिबोध नामक साहित्यिकाच्या प्रतिमेच्या करिश्मा! इतिहासकारानं इतिहास लिहिला की ती सनावळ्यांची नि घटक, प्रसंग, व्यक्तींची जंत्री बनते. तेच काम जेव्हा मुक्तिबोधांसारखा प्रतिभासंपन्न साहित्यिक करतो तेव्हा त्या लेखनास (Facts becomes Fantacy) ची संज्ञा प्राप्त होते. ‘महाबलाधिकृत' (मुख्य सेनाध्यक्ष) ‘महा दंडनायक' (सुरक्षा व्यवस्थापक), ‘संधिविग्रहिक' (युद्ध आणि शांतीची तडजोड करणारा अधिकारी) अशा शब्दकला वाचताना मॅजिस्ट्रेट, ट्रायब्युनल, कलेक्टर शब्द किती क्रूर वाटतात ना?

साहित्य आणि संस्कृती/८३