(बुद्ध काळ) ते इसवी सन पूर्व तिसरे शतक अशा सुमारे तीनशे वर्षांत सोळा महागण राज्ये विलीन होऊन चंद्रगुप्त मौर्य सम्राट झाला. मगध, कोसल, वत्स, अवंती असे आसेतुहिमालय साम्राज्य निर्माण झाले. बिंबिसार, अजातशत्रू, सिकंदर, महापद्मनंदन यांच्यानंतर विष्णुगुप्त चाणक्याने आपल्या नीतीने या महासाम्राज्यास अंतिम रूप दिले.
चंद्रगुप्त मौर्याने अनेक प्रशासनिक सुधारणा अंमलात आणल्या. प्रांत रचना केली. शासक व शासितात संवाद निर्माण केला. गुप्तचर यंत्रणेचा प्रारंभ याच युगात झाला. अंगरक्षक म्हणून स्त्री सैनिक नेमून चंद्रगुप्ताने इराणचे अनुकरण करत आपण पुरोगामी असल्याचे सिद्ध केले. चंद्रगुप्त शासन काळाचं रोमहर्षक वर्णन आपणास सेल्युकसचे राजदूत म्हणून भारतात आलेल्या मेगास्थनीजच्या वर्णनात आढळते. त्यानुसार "पाटलीपुत्र वैभवसंपन्न साम्राज्य होते. राज्यास चारी बाजूनी तटबंदी होती. ५७0 बुरूज (टेहळणी) व ६४ महाद्वार असलेले हे नगर राज्य सुमारे १० मैल लांब होतं. राजप्रसाद सुंदर होता. त्यावर इराणी वास्तुसौंदर्याचा प्रभाव होता. केशप्रक्षालनाची प्रथा व केंद्रे (सलून बाथ) होती." मुक्तिबोधांनी मेगास्थनीजची उद्धरणे देऊन लिहिलेला हा खंड त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा परिचय देतो. चंद्रगुप्त मौर्य आपल्या वृद्धावस्थेत भावुक, आध्यामिक झाला होता. इतकेच नव्हे, तर त्याने आयुष्याच्या उत्तरायणात जैन धर्म स्वीकारल्याची माहिती देत ‘भारतः इतिहास और संस्कृति' ग्रंथ म्हणजे नवनवीन माहितीचा खजिना बनतो व वाचनीय ठरतो. त्या काळी लोक प्रामाणिक होते. सुवर्णयुग असतानाही घरांना कुलपे नसत, हे वाचताना आश्चर्य वाटते.
७. अशोकाचा धर्म-विजय
हा ग्रंथ विद्यार्थी वयात इतिहासाबद्दल जाण व जाणीव निर्माण करणारा, संस्कृती व इतिहासाचा समन्वय साधणारा म्हणूनही व्यवच्छेदक ठरतो ते अशोकाचा धर्म विजय वाचत असताना, अशोक सम्राट झाल्यानंतर आपला अधिकांश वेळ अश्वशाळेत घालवत असे. तो विलासी होता. खाण्यापिण्याचा शौकीन अशोक मांसाहारी होता. त्याला मोराचं मांस आवडायचे. ‘कलिंग युद्ध' हे युद्ध नव्हते. तर तो नरमेध' होता, असे सांगत मुक्तिबोधांनी शांतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. इतिहास केवळ वर्णन न होता ते मूल्य संस्काराचे साधन बनवण्याचे कौशल्य मुक्तिबोधांच्या लेखणीत होते. सम्राट