पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानववृत्ती विजयी झाल्या. आध्यात्मिकतेच्या ठिकाणी भौतिक, सामाजिक आदर्शोना मान्यता मिळाली. जातीय व्यवस्थेवर मूले कुठार प्रहार बुद्धाने केला नि माणसाचे महत्त्व सर्वोपरी ठरले. मुक्तिबोधांनी फार मोठा काळ सूचकतेने पण वस्तुनिष्ठपणे विशद करून आपल्या सारसंक्षिप्त शैली सामार्थ्यांचा परिचय या अध्यायातून दिला आहे.


५. जैन आणि बौद्ध धर्म


 इसवी सन पूर्व सहावे शतक हे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ऐहिक दर्शन निर्मितीचा काळ. जगात सर्वत्र एकाच वेळी ही तत्त्वज्ञान, निर्माण झाली. त्या काळी नास्तिक म्हणून हिणवली गेलेली दर्शने आजच्या संदर्भात खरी आस्तिक होती. पर्शियात हिरेक्लिटस्, इराणमध्ये झरतुष्ट्र, चीनमध्ये कन्फ्यूशियस, भारतात वर्धमान, महावीर व महात्मा गौतम बुद्ध हे सारे अतिरथी महारथी एकाच वेळी उदयास आले कसे याचे आश्चर्य वाटल्या वाचून राहात नाही. पण इतिहास याचा साक्षीदार आहे की, परिस्थितीच अतिरेक हेच प्रतिक्रियेचे निर्माते असतात. त्या काळी त्यांना 'व्रात्य' म्हणून संबोधले गेले होते. (की हिणवले गेले होते ?) याचे आज आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. त्याग, करुणा, इंद्रिय नियंत्रण, आत्मशुद्धी, सदाचार, प्रेम, सद्धर्म ही जैन धर्माची तत्त्वे खरे तर तत्कालीन कर्मकांडाची प्रतिक्रिया होती. पार्श्वनाथानंतर उदयाला आलेले चोविसावे तीर्थकार वर्धमान, महावीर क्रांतिकारी ठरतात ते काळास छेद देण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीमुळे.

 तिकडे नेपाळच्या तराई प्रांतात महात्मा गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व सहाव्या शतकातच अशीच समांतर विचारधारा रुजवण्यात यश मिळवले. प्रेम, करुणा, ज्ञान, विवेक, उदात्तता, संवेदना यांना महत्त्व देणारा हा धर्म कर्माजागी मानवास महत्त्व देणारा म्हणून आशियाचा आदर्श धर्म झाला. भारताशिवाय याचा प्रचार जपान, चीन, ब्रह्मदेश, थायलंडमध्ये होऊ शकला याचं कारण या धर्मात असलेली मानवी करुणा.


६. पहिल्या साम्राज्याची स्थापना


 आर्यांच्या विविध जातींचे एकमेकांत विलीनीकरण होऊन पहिल्या महासाम्राज्याची स्थापना मगध प्रांतात झाली. इसवी सन पूर्व सहावे शतक

साहित्य आणि संस्कृती/८१