पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या काळात नव्हता, हे मुक्तिबोधांनी आवर्जून नमूद केले आहे. त्यातून पुरोगामीपण सिद्ध होते. विशेष म्हणजे आर्यांच्या काळात कोणत्याही जात, वंशाचा मनुष्य तप, विद्या निपुण होत ब्राह्मण बनायचा. ब्राह्मण जात नव्हती तर तो व्यासंगाच्या पर्यायवाची शब्द होता. आर्य मूर्तिपूजक नव्हते. त्या काळी मंदिरे नव्हती. वेद होते, पण त्याचे रूप ‘श्रुति' पर होते. हे सारे वाचत, वाचक पूर्वग्रहमुक्त होत जातो. हे या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.


४. उत्तर वैदिक काळ


 आर्य संस्कृतीच्या उत्कर्षाचा काळ म्हणून या युगास इतिहासात असाधारण महत्त्व आहे. याच काळात भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया रचला गेला. भारतीय धर्म, नीती, आचार- विचार, मत विश्वासाची रूपरेषा निश्चित होण्याचा हा कालखंड. इसवी सन पूर्व २००० ते ९०० असा हा सुमारे हजार-अकराशे वर्षांचा काळ. महाभारताचे युद्ध झाले ते याच वेळी. गंगेपासून ते गोदावरीपर्यंत आर्य संस्कृती विस्तारली ती याच काळात. या कालखंडात कुरू आणि पांचाल राज्य प्रमुख बनले. आर्य जातीत अधिकांश संकर घडून आला तो याचवेळी. राज्यव्यवस्थेस मजबुत आली. वर्णाश्रम व्यवस्थेचा पाया रचला गेला. पत्नी त्यागास घोर प्रायश्चित्त सुरू झालं. व्यवसायानुसार जाती निश्चित झाल्या. ब्रह्मा, विष्णू, महेशादी देवता अस्तित्वात आल्या. ऋषिमुनींच्या घोर तपस्येचे युग ते हेच. वैदिक साहित्य रचलं गेलं तो हा काळ. वेद, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे तयार झाली. आस्तिक व नास्तिक दोन्ही तत्त्वज्ञाने उदयास आली. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सारखी आस्तिक दर्शने एकीकडे तर दुसरीकडे जैन, बौद्ध, चार्वाकसारखी ऐहिक विचारधारांचे प्राबल्य, वैचारिक मतमतांचा गलबला ऐकला तो याच काळात. या काळात भारतावर प्लॅटिनस, सेंट ऑगस्टाईनसारख्या पाश्चात्य विचारांची भारतास ओळख झाली. कर्मसिद्धांत भारतात दृढमूल होण्याचा हाच कालखंड. संस्कृतमधून प्राकृत याच वेळी उदयाला आली आणि शौरसेनी, मागधी, मराठी (महाराष्ट्री) चा जन्मकाळ, भागवत संप्रदायाचा पण हाच जन्मकाळ भारतीय संस्कृतीत शक, यूची, आभीर, हण, पारशी, पठाण, तुर्क, इंग्रज इत्यादींच्या योगदानातून भारतीय विचार विकसित झाला. मत-मतांच्या गलबल्यानंतर शेवटी सहिष्णुता, सर्वसंग्राहकता, उदारता इत्यादी

साहित्य आणि संस्कृती/८०