पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आज सत्यात उतरलेले आपण आज हे पुस्तक वाचताना अनुभवतो. तेव्हा दिनकराच्या द्रष्टेपणाची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही.
 स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रश्नांबाबत दिनकरांनी आपल्या ‘उपसंहार' मध्ये गंभीरपणे विचार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीयांपेक्षा विदेशी लेखकच या देशाच्या प्रश्नांचा तटस्थ विचार करू शकतील. दिनकरांचे हे पुस्तक शेवटी प्रत्येक भारतीयास अंतर्मुख करणारे ठरते. “हम भारतीयों में से हर एक भारत को एक रखना चाहता है। गलत काम हम जरूर करते है, लेकिन, गलतियाँ करने के बाद हमें शर्म भी होती है। हम पश्चात्ताप भी करते है । पता नहीं, आगे चलकर विजय पश्चात्ताप की होगी अथवा उन संकीर्ण भावनाओं की, जो हमसे देश का अहित करवाती है।" (पृ.५२८) ही चिंता दिनकरांनी व्यक्त केल्यानंतर सुमारे सहा दशकांचा काळ सरून मागे पडला. लक्षात काय येते, तर आपल्या संकुचित भावनांचाच प्रभाव व प्राबल्य वर्तमानात दिसते. पश्चात्तापाचा पराभव झाला असे घडले नाही, ही या देशाची वर्तमान शोकांतिक आहे. 'संस्कृति के चार अध्याय' सारखे पुस्तक वर्तमानात 'गीता' नि ‘संविधान' म्हणून वाचक वाचतील. हे पुस्तक वर्तमानाचे ‘बायबल' ‘कुराण’ ‘गुरू ग्रंथसाहेब' बनेल. तरी कदाचित उद्याचा भारत जात-धर्म मुक्त, प्रगल्भ लोकशाहीचे निधर्मी, विज्ञानवादी, अंधश्रद्धामुक्त आधिभौतिक सामासिक समन्वित संस्कृतीचे राष्ट्र बनेल. ते दिनकरांचे स्वप्न होते. या ग्रंथाची नजीकच्या काळात (२०१६) 'हीरक जयंती' साजरी होईल. तेव्हा हा ग्रंथ भारताच्या सर्व भाषेत नेण्याचा कार्यक्रम साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय ज्ञानपीठाने हाती घ्यायला हवा. या कामी भारत सरकारने पुढाकार घ्यावा. वर्तमान पंतप्रधान नुकतेच दिनकर लेखन सुवर्ण जयंती समारंभात म्हणाले होते की, 'जात, धर्माच्या जोखडातून भारत मुक्त करायला दिनकरांच्या साहित्याशिवाय दुसरा पर्याय नाही.' ते जर खरं असेल तर हा ग्रंथ प्रत्येक भारतीयांच्या घरी पोहोचला पाहिजे. या ग्रंथातील विचारांना राष्ट्रीय मान्यता व पाठबळ मिळेल तर उद्याचा भारत दिनकरांना अभिप्रेत सामासिक समन्वित संस्कृती संवाहक राष्ट्र बनेल.


• संस्कृति के चार अध्याय - रामधारी सिंह 'दिनकर'

लोकभारती प्रकाशन, पहली मंजिल, दरबारी बिल्डिंग,

महात्मा गांधी मार्ग, इलाहाबाद (उ. प्र.)

प्रकाशन - १९५६ पृष्ठे ५३२ मूल्य रु.३00/

■ ■

साहित्य आणि संस्कृती/७४