पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शाळांचे जाळे देशात विकसित झाले. स्त्री शिक्षणाची पहाट झाली. इंग्रजी साहित्य संपर्कामुळे देशी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या. कला, शिल्प, वास्तू सर्वच क्षेत्रात युरोपचा वरचष्मा राहिला. ख्रिश्चन धर्मातर गरीब वर्गात घडून जातिभेद कमी होण्यास, अस्पृश्यता निवारणास साहाय्य झाले ही दिनकरांने ग्रंथातील निरीक्षणे योग्यच म्हणायला हवीत. देशात प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, महाराष्ट्र समाज, सत्यशोधक समाज, थिऑसॉफिकल सोसायटी, आर्यसमाज स्थापन होऊन भारतीय समाजाच्या नवोत्थानाची चळवळ सुरू झाली. यातून सती प्रथा बंदी, बालविवाह बंदी, केशवपन प्रथा विरोध, परित्यक्ता विवाह अशा अनेक सुधारणा समाजात घडून आल्या. या सर्वांचा संक्षिप्त आढावा दिनकरांनी चर्चित ग्रंथात घेतला आहे. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, राजाराम मोहन रॉय, लोकमान्य टिळक, महायोगी अरविंद, महात्मा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे संस्कृती व राष्ट्र विकासाचे कार्य चौथ्या अध्यायात नमूद करून दिनकरांनी महाराष्ट्र, बंगाल व दक्षिण भारतातील सुधारणावादी विचारधारांबद्दलचा आपला आदर व अभ्यास एकाच वेळी सिद्ध केला. या काळात सर्वच धर्मात निर्माण झालेल्या जागृती व नवविचारांची दखल ग्रंथात घेण्यात आली आहे. कवी महंमद इकबाल, रवींद्रनाथ टागोरांच्या राष्ट्रवादी कार्याचीही विशेषवाने प्रशंसा दिनकरांनी केली आहे. ती राष्ट्रीय, राष्ट्रीयतेच्या म्हणजेच सामाजिक संस्कृती निर्मितीच्या अनुषंगाने ज्या मुस्लीम विचारक साहित्यिक व नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हिंदुस्थान अखंड ठेवण्यात ज्यांचे योगदान आहे. अशा सर्व जाती, धर्म, प्रांत, भाषा, साहित्य, समाजाची नोंद घेत दिनकरांनी ‘संस्कृति के चार अध्याय' हा आपला ग्रंथ सर्वग्राही व सर्वसमावेशक कसा होईल, याची घेतलेली काळजी म्हणजे देशाप्रती लेखकाच्या असलेल्या बांधिलकी व जबाबदारीच्या भावनेचे संवेदनशील प्रगटीकरणच होय.

 या ग्रंथात देश विभाजनाचे शल्य दिनकरांनी नमूद केले आहे. भारताचे विभाजन वा फाळणी एका अर्थाने धार्मिक विभाजनच ठरले तरी विभाजनानंतरही दोन्ही देशात हिंदू-मुस्लीम राहिले. फाळणीनंतरच्या दंग्यात अनेक हिंदू, सिंधी, पंजाबी, काश्मिरी भारतात आले. मूळचे तर होतंच, पण त्यांच्यासह एकात्म भारत उभा करणे हे देशापुढचे आव्हान दिनकरांनी ‘उपसंहार' मध्ये थोड्याशा चिंतातुर स्वरात व्यक्त केले आहे. त्यासाठी देशाच्या भीषण सांस्कृतिक वास्तवाची दिनकरांना असलेली जाण आणि जाणीवच प्रतिबिंबित झाली आहे. प्रांतीयता, जातिभेद, पक्षांधता, केंद्रीय सत्तेविरुद्धची नाराजी इत्यादीसारखे १९५६ साली नोंदवलेले संभाव्य धोके

साहित्य आणि संस्कृती/७३