पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘भारतीय संस्कृती आणि युरोप' शीर्षक चौथ्या अध्यायात दिनकरांनी युरोपातून व्यापार व साम्राज्य विस्ताराच्या हेतूने भारतात आलेल्या पोर्तुगाल, डच, फ्रेंच आणि इंग्रजांच्या आगमनाचा परामर्श या ग्रंथात घेतला आहे. ग्रंथाच्या प्रास्ताविकात दिनकरांनी स्पष्ट केले आहे की भारतीय संस्कृतीच्या निर्मितीपासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत भारतात चार सांस्कृतिक क्रांत्या झाल्या. पहिली क्रांती आर्य-आर्येतर संपर्कातून झाली. इथे असलेल्या हिंदू धर्मातील कर्मकांड व ब्राह्मणी प्राबल्याच्या विरोधात जैन आणि बौद्ध धर्माचा उदय म्हणजे जातीय भेदभाव व धार्मिक कट्टरतेच्या विरोधातील सर्वसामान्य माणसास धर्माधिकार प्रदान करणारी व यज्ञ, यागाऐवजी सदाचार, साधेपणास आणि विशेषतः अहिंसा व तपाचे महत्त्व रुजवून माणसास जीवनाभिमुख करणारी, माणसास समाजशील करणारी ही दुसरी क्रांती होय. तिसरी क्रांती मुस्लिमांच्या भारत आक्रमण, धर्मातर व साम्राज्य विस्तारातून घडून आली. भारतीय संस्कृतीस पारंपरिकता, अध्यात्म, जातीय व लिंग भेदभावनांतून मुक्त करून शिक्षण, विज्ञान, सुधारणा, इहवादाद्वारे आधुनिक व पुरोगामी बनवणारी चौथी क्रांती म्हणजे युरोपियनांचे देशातील आगमन! व्यापार, दळणवळण विस्तार, शिक्षण, प्रसार व भारतीय सांस्कृतिक संचिताचे दस्तावेजीकरण (Documentation). पूर्व क्रांत्यांतून संस्कृती विकासाचे कार्य झाले. मुस्लीम शासन काळात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. पण इंग्रजांच्या काळात मुद्रणालयांचे आगमन झाल्याने वृत्तपत्र प्रकाशन, ग्रंथ प्रकाशनास गती येऊन भारतीय समाज गतीने आधुनिक झाला. सर्व भारतीय बोलीभाषांचे संकलन, शब्दकोश निर्मिती, लोकसाहित्याचे शब्दांकन यातून भारताचे पूर्वापार संचित ग्रंथबद्ध झाले. भारतीय संस्कृतीत घडून आलेल्या चार क्रांत्यांची चार अध्यायांत सांगितलेली कहाणी म्हणजे दिनकरांचा ‘संस्कृति के चार अध्याय' ग्रंथराज.

 आधुनिक अशा भारतातील युरोपची पहिली पावले उठवली ती पोर्तुगीजांनी. प्राचीन काळात सिकंदराला भारताचे आकर्षण होते. तेच पंधराव्या शतकात कोलंबसलाही होतं. भारत शोधू पाहणारा कोलंबस अमेरिकेत पोहोचला पण युरोपियनांनी भारतात पाऊल ठेवलं ते वास्को डी गामाच्या रूपाने. तो २७/ २८ मे, १४९८ मध्ये कालिकत बंदरात उतरला व भारतात आधुनिकीकरणाची पहाट उगवली. सोळावे शतक हे पोर्तुगीजांच्या साम्राज्य व व्यापार विस्ताराचं. भारताच्या पश्चिम किनाच्यावर पोर्तुगीजांनी एके काळी अधिराज्य गाजवलं. ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे गोवा मुक्ती संग्रामापर्यंत (१९६२) अबाधित होते. पोर्तुगीज भारतात सर्वांत आधी आले नि सर्वांत शेवटी गेले.

साहित्य आणि संस्कृती/७१