पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वाईटातून चांगले निर्माण होते म्हणतात, तसे भारतात मध्यकाळात घडलं. जात, धर्म, देव, कर्मकांड यांच्या संघर्षातून भारतात भक्तिकाव्याचा उदय झाला. संत कवींनी आपापल्या परीने सगुण-निर्गुण भक्तिकाव्य लिहिले. ते हिंदूंबरोबर इस्लाम धर्मातही लिहिले गेले. त्यातून राम, कृष्ण, प्रेम, काव्यधारा निर्माण झाल्या. हिंदू-मुस्लीम ऐक्य भावना, कर्मकांड विरोध, राजाच्या जागी ईश्वर स्थापना असे बदल घडून आले. हा काळच सामासिक संस्कृतीचा पाया ठरला. हिंदू व मुसलमान दोन्ही कवींनी एकात्मतेचा पुरस्कार केला. कबीर, जायसी, सूर.

 इतिहास लेखनात हिंदू धर्मावर इस्लामच्या प्रभावाची चर्चा होत राहते. पण वस्तुस्थिती अशी आहे की इस्लाम धर्मावर हिंदू धर्माचा प्रभाव परिणाम झाला आहे. तो क्षीण असला तरी भारतीय संस्कृती संदर्भात वा ऐक्य, आदान-प्रदान संदर्भात महत्त्वाचा आहे. इराणी तसव्वुफवर वेदान्ताचा प्रभाव आहे. सुफीमताच्या आधारे भारतात जे हिंदी काव्य निर्माण झालं ते सारं मुस्लीम कवींनी लिहिलं आहे. त्या काव्यांची कथानकं हिंदू, चरित्र हिंदू असून धर्मचिंतन मात्र इस्लामी आहे. कवी जायसींप्रमाणे रहीम, रसखान, आलम, मुमताज इत्यादी कवींचं काव्य या संदर्भात पाहता येतं. अमीर खुसरो, कबीरदास, कुतुबन, मंझन इत्यादी कवी तर या संदर्भात आघाडीचेच कवी मानायला हवेत. दिनकरांनी ज्या दृष्टीनं तसव्वुफ या सुफी मतावलंबी विचारधारांकडे पाहिलं व त्याची चर्चा या ग्रंथात केली आहे. त्यातून दिनकरांच्या मनातील हिंदू-मुस्लीम ऐक्य भावना स्पष्ट होते. उलटपक्षी दिनकरांनी ‘शंकराचार्य और इस्लाम', 'गुरू परंपरा' ‘अलवार संत', 'वीरशैव मत' अशा विषयांवर स्पष्टीकरणपर लिहून हिंदू धर्मावरील इस्लाम प्रभावही अधोरेखित केला आहे. अशा अनेकविध प्रयत्नांमुळे दिनकर ‘संस्कृति के चार अध्याय' पुस्तक समतोल लेखनाचा वस्तुपाठ बनला आहे. अशा प्रकारे या उभय धर्मानी एकमेकांला प्रभावित केले. तरी हा प्रभाव सखोल परिणाम करणारा मात्र ठरला नाही. कारण ही देवाणघेवाण तात्विक व भावनिक पातळीवर एक आदर्श बनून राहिली. हिंदूनी मुसलमानांच्या उदार तत्त्वांचे जसे अनुकरण केले नाही, तसेच मुसलमानांनी अन्य धर्माचा आदर, स्वीकार करण्याची उदारता दाखवली नाही. या उभयपक्षी कर्मठतेमुळेच खरं तर हिंदूमुसलमान दरी राहिली आहे. ती अरुंद व्हायची तर उभयपक्षी सकारात्मक स्वीकारभाव रुजला पाहिजे हे दिनकरांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. त्यात ते कमालीचे वस्तुनिष्ठ होतात. यातच या ग्रंथाचं धार्मिक, सांस्कृतिक उपयोजन सामावलेले आहे.

साहित्य आणि संस्कृती/७०