पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुणात्मक असते. डॉ. देवराज यांच्या मते मानव सर्जनशील आहे व मानवी संस्कृती त्याचे एक रूप आहे. ते असे म्हणतात की, 'संस्कृती म्हणजे मानव जातीच्या सर्व ग्राह्य जीवन रूपांची निर्मिती आणि तिचा उपयोग करणे होय. ते असे मत व्यक्त करतात की, “एस.एन. वैद्य यांच्यासारखे विचारवंत हे भौतिकतावादी व मानवतावादी आहेत. त्यांना मोक्ष व अध्यात्म या कल्पना मान्य नाहीत. त्यांच्याद्वारे ऐहिक व नैतिक जीवन जगता येते. पण डॉ. देवराज यांना ते मान्य नाही. त्यांच्या मते मानवी व्यक्तिमत्वाचा विकास हा त्याच्या असंख्य संवेदनांचा व प्रेरणांचा विस्तार होय. या प्रगतीतून त्याचा विवेक जागृत होतो. ज्याच्या साह्याने ती व्यक्त सत्यासत्य, श्रेष्ठ व कनिष्ठ मूल्ये यांचा निवाडा करीत असते. मूल्यांच्या गुणात्मक प्रेरणांचे रूप आध्यात्मिक वृत्ती आहे. ज्यामधून परहिताकांक्षा, त्यागाची वृत्ती आणि सर्वभूतांप्रती समभाव निर्माण होतो. त्यांचे असे मत आहे की जोवर माणूस मूल्यांचा शोध घेत असतो व मूल्यांची निर्मिती करीत असतो तोवर तो सर्जनशीलच असतो. मानवी प्रगतीची दिशा ही उच्च अशा सांस्कृतिक मूल्य प्रेरणांचा विकास करण्याची राहिली आहे. डॉ. देवराज यांची अशा प्रकारे आदर्शवादी दृष्टिकोनातून संस्कृतीची तात्त्विक बाजू मांडली आहे.
 भारतीय संस्कृती ही समन्वयावर आधारित असून येथील अनेक परंपरांनी ती सर्व समावेशक बनली आहे, असे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते म. गांधी व पं. जवाहरलाल नेहरू यांचे मत होते. आपल्या Discovery of India या पुस्तकात नेहरूंनी आपली ही भूमिका मांडली होती. पण ही समन्वयाची व समावेशनाची प्रक्रिया कशी झाली, विविध संस्कृतीचा संगम कसा झाला, याचे साधार व सविस्तर विवेचन करण्यात आले नव्हते. हिंदीतील प्रख्यात कवि रामधारी सिंह 'दिनकर' यांनी संस्कृती के चार अध्याय' या ग्रंथात हे काम केले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यास प्रस्तावना लिहिली आहे. आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात की, “कोणतीही जिवंत संस्कृती ही परिवर्तनशील असते आणि परंपरेच्या आवरणाखाली ती आतून बदलत असते. भारत हा अनेक वंशांचा, धर्मांचा मिळून बनलेला देश असून तो सर्वांचा आहे. कोणताही एक गट भारतावर आपल्या एकाधिकार सांगू शकत नाही. या देशाच्या जडणघडणीत प्रत्येकाचे योगदान आहे. उदारता व सहिष्णुता ही तिची वैशिष्ट्ये आहेत."
 ‘संस्कृति के चार अध्याय' या पुस्तकात चार वेगवेगळ्या भागात दिनकरांनी भारतीय संस्कृती विकासाचे वर्णन केले आहेत. त्यातील पहिला