पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उभा आहे. जीव, पुदगल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ही या धर्माची प्रमुख सहा अगे होत. या धर्मात मोक्ष साधनेचा अधिकार फक्त साधूना असल्याने धर्मात साधू, साध्वींना असाधारण महत्त्व आहे. हा धर्म अनेकांतवादास मान्यता देतो. जैन धर्माची तत्त्वे कालांतराने हिंदू धर्माने स्वीकारल्याने या धर्माचे विशेष स्थान राहिले नाही. हा लेखक निष्कर्ष महत्त्वाचा खरा!

 सुगम आणि सुबोधतेच्या पायावर उभा असलेला बौद्ध धर्म, जैन धर्मानंतर उदयास आला. या धर्माच्या आर्य सत्य नि अष्टांगिक मार्गाची दिनकरांनी ‘संस्कृति के चार अध्याय' मध्ये व्यापक चर्चा केली आहे. या धर्मात असलेले वैदिक धर्मातील साम्य सांगायला दिनकर विसरत नाहीत. ते हेही विशद करतात की, हा प्रामुख्याने ‘आचारधर्म' आहे. हा धर्म हिंदुत्त्वाचे बौद्धिकीकरण होय. बुद्धाचा धर्मावरील प्रभाव आजही टिकून आहे. पण पडझड झाली ती आचरण, व्यवहारात. राजाश्रमामुळे, श्रमण, भन्ते, मठ, मंदिरे ऐश्वर्याची व विलासाची केंद्रे बनली. भगवान महावीर चांदीचा तर भगवान बुद्ध सुवर्णमय बनून जाणे, मूर्ती, मंदिरांचा, स्तुपांचा अतिरेक यामुळे मूळ धर्म तत्त्वांचाच पराभव झाला. अंध विश्वासाचा विरोध करणारे धर्म त्याचेच शिकार झाले. हे पतन विसंगतीचे अपत्य होय, हे दिनकरांचे अनुमान क्लेषकारक वाटते. पण कठोर सत्य म्हणून स्वीकारण्यास पर्यायही उरत नाही.

 दिनकरांनी या अध्यायातील ‘वैदिक बनाम (विरुद्ध) बौद्ध मत’ प्रकरणात गांधीवाद, मार्क्सवाद, शून्यवाद इत्यादी विचारधारांची चर्चा करत जैन व बौद्ध धर्म विस्तार व प्रसाराच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. ‘श्रीमद्भगवद्गीता', गणित, ज्योतिष, सर्वांची विवेचना करत दिनकरांचं विज्ञानापाशी येऊन थांबणे यात त्यांच्या विचारांचे व्यापक क्षितिज नुसते स्पष्ट होत नाही, तर ग्रंथ लेखनाच्या मूळ उद्दिष्टांचं भान ठेवत हा लेखक सतत आपल्यातील विवेकी विश्लेषक, तर्कशास्त्री सजग ठेवतो. याची वारंवार होणारी जाणीव अप्रत्यक्षपणे वाचकालाही जागरूक बनवत राहते. हे या ग्रंथाचे फलित व योगदान म्हणून नोंदवावेसे वाटते. भारतीय धर्माच्या वैश्विक प्रसाराचा भूगोल दिनकरांना चांगला माहीत असल्याने ते मांडत असलेल्या सांस्कृतिक इतिहासास यथार्थता प्राप्त होते. बाली, सुमात्रा, बोर्निओ, हिंद-चीन, कंबोडिया, ब्रह्मदेश (म्यानमार), सयाम, जपान येथील भारतीय धर्मप्रसाराचा जो विस्तार दिनकर स्पष्ट करतात त्यातून त्यांचे संस्कृतीसंबंधी वैश्विक भानही स्पष्ट होते. आश्चर्य वाटतं की हा माणूस

साहित्य आणि संस्कृती/६६