पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनेक विधान करत दिनकर त्यांची साद्यंत माहिती देतात व दुसरीकडे त्यांचं वैयर्थही समजाविण्यास विसरत नाहीत. या सर्वांची चर्चा ते जैन व बौद्ध धर्म निर्मितीमागील पार्श्वभूमी म्हणून करतात, हे वाचकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

 'जैन व बौद्ध धर्मांची स्थापना म्हणजे वैदिक धर्माविरोधी केलेला विद्रोह होय.' (पृ.१०४) हे नि:संदिग्ध शब्दात सांगताना दिनकर कचरत नाही. त्यातून या लेखकाचं प्रागतिकपणा स्पष्ट होतो. ‘संस्कृति के चार अध्याय' ची चर्चा पन्नास वर्षे होऊन गेली, ती लेखनाच्या हीरक महोत्सवी उंबरठ्यावर उभा असतानाही होत राहते. याचं कारण या ग्रंथाची वैचारिक बैठक पुरोगामी आहे म्हणूनच! जैन व बौद्ध धर्म कर्मकांड विरोधात जन्मले तरी विकास, प्रचार, प्रसारानंतर त्यांनाही कर्मकांड कसे ग्रासले, त्यांची शकले-पंथभेद दिगंबर- श्वेतांबर अथवा महायान- हीनयान कसे झाले हे सांगायला ते विसरत नाहीत. ही असते दिनकरांची तटस्थता व वस्तुनिष्ठताही!

 ज्या काळात भगवान महावीर जन्मले, गौतम बुद्धाचा अविर्भाव झाला त्याच काळात जगातील अनेक धर्माचे संस्थापक, तत्त्वचिंतक, गणिती जन्माला आले. चीनमध्ये लाव-जे, कन्फ्यूशियस, ग्रीसमध्ये पायथागोरस, इराणमध्ये झरतुष्ट्र, पॅलेस्टाईनमध्ये युरेमिया, इजकील या सर्वांचा काळ एकच. हा योगायोग नव्हे, तर तत्कालीन कर्मठपणाविरोधाचा तो बुद्धिवादी व संवेदनशील उद्गार व उद्रेक होता. या मांडणीतून धर्मोद्धारक व चिंतन हे मुळात समाज हितवर्धक असतात, हे आपण लक्षात घ्यायला हवे. यज्ञांचे समर्थन करणाच्या ब्राह्मणांविरुद्ध यज्ञास अनुपयोगी ठरवणारे जैन श्रमण जन्मतात ही आस्तिक अतिरेकाच्या टोकाची नास्तिक प्रतिक्रिया होय. ‘नास्तिको वेद निंदकः' म्हणण्याच्या काळात भगवान महावीर व भगवान बुद्ध ब्राह्मणांच्या जागी सामान्य माणसांचे महत्त्व सांगत लोकायत परंपरा निर्माण करतात. यज्ञ ही हिंसा आहे.... निसर्गाची व जिवांचीही! ती परंपरा कृषक् विरोधी आहे, आजच्या भाषेत पर्यावरण विरोधी आहे, हे बिंबवण्यात हे दोन्ही धर्म यशस्वी ठरले. त्यात जैन धर्म कर्मठ राहिल्याने आकसत जाऊन तो हिंदू धर्माचाच एक भाग बनून राहिला. उलटपक्षी उदारवादी दृष्टिकोनामुळे बौद्ध धर्म जागतिक झाला. जपान, चीन, थायलंड, नेपाळ, तिबेटादी देशांचा तो धर्म बनून राहिला. अशा तुलनेतही दिनकर धर्माचे उदार असणे, परिवर्तनशील असणे आवश्यक कसे असते हे समजावतात. जैन धर्म म्हणजे अहिंसा आणि तप यांचा समन्वय. तो चार्वाक आणि बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे नास्तिकतेवर

साहित्य आणि संस्कृती/६५