पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतीय संस्कृती व्यापक, उदार, ग्रहणशील बनत गेली. दिनकरांच्याच शब्दात सांगायचं तर, "मानव जाति को भारत वासियों जो सबसे बड़ी चीज, वरदान के रूप में दी है, वह यह है की भारतवासी हमेशा ही अनेक जातियों के लोगों और अनेक प्रकार के विचारों के बीच समन्वय करने को तैयार रहे हैं। और सभी प्रकार की विविधताओं के बीच एकता कायम करने की उनकी लियाकत (योग्यता) और ताकत लाजवाब रही है।" (पृ. ८५) पुढे दिनकरांनी या भारतीय गुणांचे वर्णन करताना म्हटलं आहे की, हे विश्व मानवतेसाठीचे मोठं वरदान आहे. दिनकरांनी या अध्यायात भारतीय संस्कृतीत जगाला देण्याचे सामर्थ्य अधोरेखित करून आपल्या संस्कृतीचं श्रेष्ठत्वच अधोरेखित केलंय असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये.

 ‘प्राचीन संस्कृति से विद्रोह' शीर्षक ‘संस्कृति के चार अध्याय' मधील दुस-या अध्यायात हिंदू धर्मातील कर्मकांडास विरोध करत अस्तित्वात आलेल्या जैन आणि बौद्ध धर्माच्या उगमापासून ते सदर धर्मांमध्ये पंथ भेद कसे झाले, कालौघात विविध पंथ, मतांचा त्यांच्यावर कोणता प्रभाव पडला यांचे विवेचन दिनकर करतात. ते करण्यापूर्वी हे धर्म ज्या विशिष्ट परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आले, त्यांची लेखकाने इथे कारणमीमांसा केली आहे. वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ यांची विचारधारा काय होती, हेही ते स्पष्ट करतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद होते. हे सारे वेद दुसरे तिसरे काही नसून यज्ञ संस्कृतीचा पुरस्कार आहे. शिक्षण, छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष आणि कल्पसूत्र या द्वारे वेदपठण, गायन, उच्चारण संबंधी नियम, चौकट, शिस्त प्रकट करण्यात आली आहेत. या कठोर शिस्तीतूनच व वेदांच्या ब्राह्मणी एकाधिकारातून ही शास्त्रे कर्मठ तर बनलीच पण त्यांनी माणसामाणसात उच्च नीचता रुजवली. ब्राह्मण ग्रंथ तर ‘नीरस असल्याने दिनकरांनी नमूद केले आहे. (पृ.९२) ब्राह्मण ग्रंथांबरोबर उपनिषदे, अरण्यके यांचीही नोंद दिनकर घ्यायला विसरत नाहीत. दिनकरांच्या मतानुसार, वृहदारण्यक, छान्दोग्य, केन, ऐतरेय, कौषी तकी, तैत्तरीय ही उपनिषदे अन्य काही नसून ती अरण्यकांची परिशिष्टे होत, असे नमूद करून दिनकर त्यांचे महत्त्व नाकारतात. (पृ. ९२) वेद निसर्गातील इंद्र, वरुण, अग्नि, सविता यांना देवता मानत. ते निसर्ग व मानवी जीवन संबंधांची चर्चा करतात. वेदाचे विकसित रूप म्हणजे उपनिषदे! वेदांमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे साडे तीन हजार मंत्र एकट्या इंद्रावर रचले गेलेत. त्यानंत अग्निचा क्रम येतो. वेदांमध्ये अवतारवादाचे वर्णन नाही. यज्ञ आणि कर्मकांड. ही नि अशी

साहित्य आणि संस्कृती/६४