पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उर्दू भाषा पूर्वी बोली होत्या. प्रत्येक भाषांत अनेक बोली प्रचलित होत्या. त्या त्या प्रांत विशेषातील बोली समूहातून उपरोक्त भाषा तयार झाल्यात. दिनकर वेदास भारताचाच नव्हे तर मनुष्य समाजाचा प्राचीन ग्रंथ मानतात. हे मात्र एकदा तपासून घ्यायला हवे असे वाटते. मोहेंजोदडो (सिंध प्रांत), हडप्पा (पंजाब), नाल (बलुचिस्थान) येथील सांस्कृतिक उत्खननात जे अवशेष आढळून आले, त्यातून हे पुरेसे सिद्ध झाले आहे की आर्य, द्रविड पूर्व काळातपण भारतात मनुष्य वस्ती होती.

 आर्य, द्रविडांच्या संबंधात विचार करताना दिनकर यांनी असे मत व्यक्त केले आहे की आर्य आणि द्रविडांना भाषिक विकास पाहता द्रविड आर्याच्या पूर्वी भारतात आले असावेत. त्यासाठी ते विविध इतिहासकार, प्राच्यविद्या अभ्यासकांची मते उद्धृत करत आपल्या मतांना बळकटी देतात, ‘संस्कृति के चार अध्याय' ग्रंथाचे हे वैशिष्ट्य आहे की ग्रंथ इतिहास, साहित्य तत्त्वज्ञानाच्या आधारे लिहिला गेला असला तरी तो कपोलकल्पित होणार नाही, याची काळजी दिनकर सतत घेत राहतात. संभाव्य सत्याचा परीघ त्यांनी प्रसंगी ओलांडला असे सहसा दिसत नाही. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संदर्भ सूची देऊन (ग्रंथनाम, लेखक, पृष्ठ) आपल्या लेखनास असलेली संशोधनाची वैज्ञानिक शिस्त जागोजागी दिनकरांनी जपल्यानेच या ग्रंथास प्रमाणरूप आलेले आहे. द्रविड कोण होते? आर्यांचे मूळ स्थान कोणते? ऋग्वेदाचा रचनाकाळ काय? भाषा, लिपींचा विकास काय सांगतो? हे सारे मांडत ते आपल्या मांडणीस बळकटी देत रहातात. वैदिक संस्कृती ही आर्य आणि द्रविडांची संयुक्त निर्मिती होय, हे प्रतिपादन करताना दोहोंतील समान व विरोधाच्या बाबी नोंदवत ते निष्कर्षांकडे जातात. केवळ शास्त्रीय नाही तर या दोन्ही वर्गाचे लोक, त्यांचे स्वभाव, परंपरा, ठेवण, समाजरचना, वर्णव्यवस्था इत्यादींचे त्यांनी केलेले विश्लेषण त्यांचा सर्वांगी व्यासंग सिद्ध करतो. जात, धर्म, विवाह, राहणीमान, प्रथा, परंपरांचा दिनकरांचा अभ्यास पुस्तकी नसून मांडणीत निरीक्षण, पर्यटन, चिंतन यातून स्वत:ची विकसित जाण ते जागोजागी नोंदवतात. त्यामुळे या ग्रंथास दिनकरांच्या वैचारिक बैठकीचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे व शिवाय ते पुरोगामी दृष्टीचे आहे, हे लक्षात येते. भारतीय संस्कृती' सारखे याच विषयांवरचे साने गुरुजींचे पुस्तक हा ग्रंथ वाचताना प्रकर्षानं आठवत राहतं. साने गुरुजीमधील भाबडेपणा, हळवेपणा, प्रेम इथे नाही. असेलच तर इतिहासकारांचा कठोरपणा आणि तटस्थता, पण त्यात कोरडेपणा कुठेच

साहित्य आणि संस्कृती/६२