पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दर्शन (तत्त्वज्ञान) का है। इतिहास की हैसियत यहाँ किरायेदार (भाडेकरू) की है। याचा अर्थ असा की त्यांनी हा ग्रंथ इतिहास ग्रंथ म्हणून लिहिला नाही. इतिहासाची येथील उपस्थिती गौण आहे. ग्रंथाचे महत्त्वाचे पक्ष तात्त्विक व साहित्यिक आहेत. तरी परंतु वाचकांपुढे हा ग्रंथ भारताचा मनुष्य जन्मापासून ते भारत स्वातंत्र्यापर्यंतचा विस्तृत इतिहास काळ जिवंत करतो. या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य राहिले आहे ते भूमिकेतून स्वतः दिनकरांनीच विशद केलं आहे. ते असे की सर्वसाधारणपणे इतिहासकार आपल्या लेखनात विशिष्ट शैलीचा अंगिकार करत असतो. शिवाय तो ज्ञान, विज्ञानाच्या एखाद्याच शाखेत पारंगत अथवा प्रवीण असतो. त्यामुळे त्याच्या लेखनास आपसूकच एक मर्यादा येते. तो अवशेष, नाणी, जीवावशेषात अडकून राहात जुनेच नव्याने सांगत रहातो. इतिहासाचा सांस्कृतिक अन्वय विशद करणारा माझ्यासारखा लेखक केवळ पुराव्यात अडकून न राहिल्याने कल्पना, तर्काच्या आधारे तो अधिक सजीव, संभाव्य शक्यता अथवा सत्याजवळ जातो असे त्यांचे म्हणणे होते. माझ्या मते, या म्हणण्याला भाबडेपणा म्हणता येणार नाही. त्याच काळात जगात (१९५०) 'डिफरन्शियल इक्वेशन्सवर काम सुरू झाले होते. गणिताच्या क्षेत्रात जॉन नॅश यांनी अलीकडच्या काळात ‘गेम थिअरी' मांडली. तिला १९९४ ला नोबेल मिळवून जगमान्यता लाभली. मूळ गणितातील संकल्पना आज अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास सर्व क्षेत्रात वापरली जाते. ‘गेम थिअरी' द्वारे संघर्ष, सहकार्य आणि मनुष्य वर्तन अशा व्यापक क्षेत्रात भाकिते शक्य झाली आहेत. ही थियरी पन्नास वर्षांपूर्वी लेखनात वापरून दिनकरांनी आपले द्रष्टेपण सिद्ध केले आहे.

 पंडित नेहरूंनी दिनकरांच्या या ग्रंथलेखनाची मार्मिक मीमांसा या ग्रंथास लिहिलेल्या आपल्या प्रस्तावनेत केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिनकरांनी लेखनासाठी सर्वथा नवा विषय नि दृष्टिकोन स्वीकारला आहे. संस्कृती नि इतिहास हा व्यापक विषय असून कोणीही एक व्यक्ती त्यास पूर्ण न्याय देऊ शकत नाही. यापूर्वी संस्कृतीची व्याख्या अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची त वरीलप्रमाणेच झाली. नेहरूंच्या म्हणण्यानुसार ‘संस्कृतीस राष्ट्रीय संदर्भ असतात, तसेच आंतरराष्ट्रीयही पण प्रत्येक राष्ट्राची स्व संस्कृतीविषयी एक धारणा असते. तिचे आकलन एतद्देशीय जितके चांगले करू शकतील, तितके अन्य कोणी करू शकेल याबद्दल मी साशंक आहे. भारतीय संस्कृती निश्चितच दिनकरांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे सामासिक असून, तिचा विकास कालौघात होत आला आहे. विद्वानांनी या संस्कृतीचे

साहित्य आणि संस्कृती/६०