पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याखाली सक्रिय होते. त्यांचे अस्पृश्यतोद्धार, भूकंप निवारण कार्य दिनकरांपुढे अनुकरणीय आदर्श म्हणून होता. त्यामुळे दिनकरांनी ‘संस्कृति के चार अध्याय' ग्रंथ डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सामायिक सांस्कृतिक प्रतिमेस अर्पण केला आहे.

 ‘संस्कृति के चार अध्याय' ग्रंथाच्या भूमिकेत दिनकरांनी हे स्पष्ट केले आहे की, साहित्य अध्यापन करताना त्यात इतिहासाचे वारंवार संदर्भ येत. ते विद्यार्थ्यांना समजावून सांगताना प्राचीन साहित्य आधुनिक संदर्भात विशद करताना त्यांना आपल्या व पूर्व ग्रंथांच्या, संदर्भाच्या मर्यादा जाणवायच्या. या मर्यादा पूर्व संदर्भ ग्रंथांच्या होत्या. तशाच आकलन, विश्लेषणाच्याही पूर्व. इतिहास ग्रंथ वेगवेगळ्या दृष्टीने लिहिलेले त्यांना दिसून आले. स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा विचार करताना सामाजिक रचनेचं नवं भान त्यांना आवश्यकच नाही, तर अनिवार्य वाटू लागलं होतं. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून त्यांना याची जाणीव प्रकर्षानं झाली की आपली प्राचीन संस्कृती प्रारंभापासूनच सामासिक (संयुक्त/मिश्र) राहिली आहे. इथे वेगवेगळ्या जात, धर्म, वंश, भाषा, परंपरा निरंतर विकसित होत राहिल्या आहेत. वैविध्यातून, संघर्ष आणि आक्रमण, अत्याचार, शोषण, धर्मांतरांचे अनेक प्रयोग होऊनही इथे एकता टिकून राहिली. त्याचं कारण इथे सामासिक (सामाजिक नव्हे!) संस्कृती घट्ट पाय रोवून उभी आहे म्हणूनच. पण खरेदाची गोष्ट अशी की पूर्व इतिहासकारांनी या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यांची परिपूर्ती, भरपाई म्हणून त्यांना भारतीय इतिहासाबरोबरच अथवा इतिहासाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक विकासाची चिकित्सा करणे आवश्यक वाटले. वर सांगितल्याप्रमाणे सामन्यांसाठी लिहिलेल्या या ग्रंथांचे आधार, संदर्भ मात्र पूर्वसुरी इतिहासकारांचे लेखनच राहिले. आपलं लेखन म्हणजे या पूर्वसुरींच्या विद्वत्तापूर्ण विवेचनाची उष्टावळ ठरते. अशी नम्रता ते या ग्रंथाच्या भूमिकेत व्यक्त करतात. त्यास त्यांनी ‘उच्छिष्ट' असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामागे व्यंग-भाव नाही. असेलच तर दृष्टिकोनभेदाचे शल्य! परंतु हा ग्रंथ विषय, आशय, मांडणी, विस्तार (पृष्ठ संख्या ५३२), संदर्भ कोणत्याच अंगाने सामान्य वाचकांचा राहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. उलटपक्षी हा ग्रंथ बुद्धिवंत, ज्ञानवंत, समाजालाही तो आव्हान ठरला आहे.

 दिनकर ‘संस्कृती के चार अध्याय' या आपल्या ग्रंथास एकतेचा सैनिक मानतात. आपला ग्रंथ त्यांच्या दृष्टीने इतिहास ग्रंथ नसून साहित्यिक रचना होय. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर “यह महल (ग्रंथ) साहित्य और

साहित्य आणि संस्कृती/५९