पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘संस्कृति के चार अध्याय': समन्वित संस्कृतीचे स्वप्न आणि सत्य


 रामधारी सिंह 'दिनकर' हिंदी साहित्यात कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी काव्याबरोबर निबंध, समीक्षा, इतिहास, संस्कृतीसंबंधी विपुल गद्य लेखन केलं आहे. त्यांच्या संस्कृति के चार अध्याय' (१९५६) या हिंदी ग्रंथामुळे त्यांना साहित्य आणि इतिहासाचे विश्लेषक म्हणून भारतभर मान्यता मिळाली. ही मान्यता मिळून चर्चा व्हायला दोन कारणे झाली. एकतर या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. दुसरे असे की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची या ग्रंथास प्रस्तावना लाभली होती. तत्पूर्वी नेहरूंची त्यांचा इतिहास व्यासंग सिद्ध करणारी दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. एक होते ‘ग्लिम्सस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी' (१९३९) तर दुसरे होते ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया' (१९४५) या पार्श्वभूमीवर या ग्रंथास लाभलेल्या प्रस्तावनेस असाधारण महत्त्व होते. दिनकर यांच्या जीवन व विचारांवर महात्मा गांधींचा प्रभाव होता. तो ‘बापू' या त्यांच्या काव्यातून स्पष्ट होता. संस्कृती के चार अध्याय' ग्रंथाच्या विवेचन, विश्लेषणातूनही दिनकरांचा गांधीवादी दृष्टिकोन स्पष्ट होतो. दिनकरांची गांधीवाद, समाजवाद व मानवतावादावर श्रद्धा होती. असे असले, तरी भारतीय इतिहास व संस्कृतीबद्दल जाज्वल्य अभिमान ज्वलंत राष्ट्रप्रेम, दलित व पीडित जनतेबद्दल अपार आस्था ही त्याच्या लेखनाची बलस्थाने होती. सामान्यांविषयी कणव या ग्रंथ लेखनामागे आहे. ग्रंथाच्या भूमिकेत आपण हा ग्रंथ जनसामान्यांसाठी लिहिलेला आहे याची त्यांनी स्पष्ट शब्दात कबुली दिली आहे. दिनकर बिहारमध्ये जन्मले, वाढले, शिकले, बिहारच त्यांची कर्मभूमी राहिली. मुख्याध्यापक, प्राध्यापक, कुलगुरू अशा साच्या भूमिका त्यांनी बिहारच्या भागलपूर, पटना, मुंगेर जिल्ह्यात वठवल्या. डॉ. राजेंद्रप्रसाद

साहित्य आणि संस्कृती/५८