पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सार्थकतेचा शोध घेऊ इच्छित नसतात, ज्या गुणांच्याच आधारे संत चरित्रासारखे उच्च मानवीय व्यक्तित्व निर्माण होत असते. अशा चरित्रांचे महत्त्व कला अथवा तत्त्वज्ञानापेक्षा खरे तर तसूभरही कमी नसते.

 मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे दोन पक्ष होत (१) गुणात्मक (२) संख्यात्मक, मानवी व्यक्तिमत्त्व विकासाचा अर्थ असा की व्यक्ती प्रेरणेच्या असंख्य संवेदना आणि जाणिवांचा विस्तार. हा ऐतिहासिक मानव प्रेरणांचा संग्रह होय. दुसरे असे की ही प्रगती माणसात असा विवेक जागवते, जेणेकरून तो उच्च काय नि हीन काय यातील फरक करण्याची सारासार बुद्धी ग्रहण करतो. मूल्यांच्या गुणात्मक प्रेरणांचे सर्वोच्च रूप मोक्षधर्म वा आध्यात्मिक वृत्ती होय. ही मनोवृत्ती दोन प्रकारे प्रकट होते १) सामान्य माणसं ज्या छोट्या अपेक्षा करतात त्याप्रती नैराश्य. २) उदारता व त्यागाची संत प्रवृत्ती. वस्तुतः एक व्यक्ती त्या टोकापर्यंतची उदारता, परहितकांक्षी वृत्ती धारण करू शकतो, जी संतांनी केलेली असते. कोणत्याही प्रकारच्या सांस्कृतिक व्यवहारात रममाण होण्यासाठी थोडीबहुत उदासीनता, अपरिग्रहवृत्ती अनिवार्य असते. माणूस ज्या प्रमाणात मूल्य अन्वेषणाचे अनुगमन करत विरक्त होत जातो, त्या प्रमाणात तो सांस्कृतिक मूल्यांच्या संदर्भात प्रत्यक्ष सहभागी व उत्पादन योग्य बनतो. ज्यांना आपण संत म्हणतो ते संसार विरक्त असतात. अस्थायी प्राप्ती संदर्भात ते पूर्णत: उदास असतात. (अशी उदासीनता कलाकार, विचारवंत प्राप्त करू शकत नसतात.) ही कल्पना स्वच्छंदतापूर्वक एका अशा विश्वाची असते जे अनंत, रहस्यमय मूल्यांचे अधिष्ठान असते. संत ईश्वरीय चरम तत्त्वांसंबंधी आग्रही असतात, असेही असू शकते की ते बुद्धाप्रमाणे त्या तत्त्वाबद्दल निर्णायक मत देणे नाकारतीलही. प्रश्न इतकाच महत्त्वाचा की माणसास मानवी जीवनाच्या उच्चतम शक्यतांच्या संदर्भात विश्वास वा आस्था आहे की नाही.

 सारांशतः म्हणता येईल की, माणूस मूल्यांचा शोध नि सृष्टी करत रहातो तोवर त्याची प्रवृत्ती प्रामुख्याने सर्जनशीलच असते. मानवी प्रवृत्तींच्या अधीन राहून तो गरजेनुसार परमवृत्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. मानवाच्या प्रगतीची दिशा ही सदैव सांस्कृतिक व मूल्य प्रेरणांच्या निरंतर विकास व उन्नतरूपाकडे अग्रेसर राहिली आहे. मानव व्यक्तिमत्त्व आणि सुधारणा अशी ध्येये होत की, जी प्राप्त करण्यासाठी व्यक्ती आणि राष्ट्र दोन्हींसाठी राजनैतिक, आर्थिक, शैक्षणिक प्रयत्नांचे अधिष्ठान अनिवार्य असते. अगणित संपत्ती आणि शक्ती संपादन हे काही मानवाचे नैसर्गिक ध्येय नव्हे.

साहित्य आणि संस्कृती/५५