पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मानवी सर्जनशील अभिव्यक्ती : संस्कृती आणि सभ्यता

 मानवनिर्मित परिस्थितीतील प्रत्येक गोष्ट जी मानव जीवनास उपकारक आहे, ती मानवी सर्जनशीलतेतूनच निर्माण झाली आहे. ती त्याचाच आधार बनून राहात असते. ही सर्जनशीलता बाह्य वास्तव आणि आंतरिक जीवन दोन्हीतही प्रतिबिंबित असते. पहिल्या अवस्थेत सृजनशीलतेच्या उद्देश उपयोगिता असतो तर नंतर माणसाच्या आंतरिक जीवनाच्या प्रसार आणि समृद्धी करणे तिचे ध्येय असते. उपयोगितेच्या अंगाने क्रियाशील मानवीय सर्जनशीलता औद्योगिक वस्तुक्रमाची (Technological order) विकसित करते. तो क्रम मानवी सभ्यतेचा भाग असतो. मानवी जीवनासाठी निरुपयोगी परंतु आर्थिक उत्पादनासंबंधीच्या शक्यता ती शोधून काढते. त्यातून एक नव्या संस्कृतीचा उदय होतो. ती संस्कृती कला आणि चिंतनाच्या स्वरूपात प्रकट होत असते. तो मानवी संस्थागत जीवनाचा असा बिंदू असतो, जिथे उपयोगी निरुपयोगी असे दोन्ही जीवनक्रम एकत्र येतात, त्यांचा संगम होत असतो. वैज्ञानिक शोधाची प्रक्रिया जिथे निरुपयोगी होते, तोपर्यंत तिचे जीवनाच्या सांस्कृतिक क्रमात संबंध आणि स्थान असते.

 संस्कृती म्हणजे सर्जनात्मक चिंतन होय. हे चिंतन मानवी जीवनाची यथार्थ सार्थकता तसेच निरुपयोगी अंगांसंबंधीच्या प्रेरणा यातून झरत राहते. संस्कृतीची व्याख्या दुस-या अंगानेही करता येणे शक्य आहे. संस्कृती मानव जीवनाच्या आत्मिक (मानसिक) जीवनाच्या विस्तार व समृद्धी करणाच्या क्रिया, प्रक्रियांचे संघटित वा संयुक्त रूप होय. माणसाचे आत्मिक जीवन अनेकदा प्रतीकात्मक रूपात व्यक्त होत असते. सांस्कृतिक क्रिया तिच्या आत्मिक स्वरूपात अतिरिक्त सक्रियतेने व्यक्त करत असतात. यातून जीवनाचे सार्थक रूप आकारास येत असते. सर्वसाधारण माणसे कल्पनेने याची अनुभूती ग्रहण करतात. सर्वसामान्यतः असे सांगता येईल की संस्कृती म्हणजे मनुष्यजातीच्या सर्वग्राह्य वा मान्य जीवनरूपांची सृष्टी नि तिचा उपयोग होय. मानवी संस्कृती ही उपलब्धी असून ती सतत वर्धमान (Cumulative) होत असते. ती ऐतिहासिक असते. सांस्कृतिक प्रगती दोन दिशेने होत असते. एकीकडे ती माणसाच्या आंतरिक वा आत्मिक जीवन स्वरूपाचा विस्तार करते. तर दुसरीकडे ती त्याच्या जाणीव आणि संवेदनांचे परिष्करण व विकासही करत राहते.

साहित्य आणि संस्कृती/५०