पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रस्तावना

 भारतामध्ये खोलवर असा संस्कृती विचार विविध भाषांमध्ये मांडण्यात आला आहे. मराठी भाषेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य स. ज. भागवत दुर्गा भागवत, पु. ग. सहस्त्रबुद्धे आणि प्रा. इरावती कर्वे यांनी संस्कृतीच्या विविध अंगाची चर्चा केली. हिंदी भाषेमध्ये आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी रामधारी सिंह 'दिनकर' जैनेंद्रकुमार, गजानन माधव मुक्तीबोध, राहुल सांस्कृत्यायन, विष्णु प्रभाकर, डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी पण या विषयावर विपुल प्रमाणात लिखाण केले. हिंदीचा हा समृद्ध वैचारिक ठेवा भारतातील इतर भाषिकांना विशेषतः मराठी भाषिकांना प्राप्त व्हावा व त्याद्वारा राष्ट्रीय एकात्मतेचा आणि आंतरभारती'चा विचार दृढ व्हावा म्हणून हिंदीचे ख्यातनाम प्राध्यापक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी हजारीप्रसाद द्विवेदी, दिनकर, मुक्तीबोध, जैनेंद्रकुमार, राहुल सांस्कृत्यायन, विष्णु प्रभाकर व डॉ. देवराज यांच्या संस्कृती चिंतनाचा आपल्या साहित्य आणि संस्कृती या पुस्तकात परिचय करून देऊन मोठेच काम केले आहे. कारण वर सांगितलेल्या थोर अभ्यासकांच्या समृद्ध विचारवंतांची मराठी भाषिकांना फारशी माहिती नव्हती. भारतीय सांकृतीचा अतूट आणि चिवट धागा भारतीय भाषांमध्ये विद्यमान असला तरी प्रत्येक भाषिक गटांची व त्यांच्या संस्कृतीची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत आणि हिंदीतील संस्कृती विचार वाचताना ती पृथगात्मता लक्षात येते. कारण त्यांच्या मांडणीत विशिष्ट प्रदेशाचे, भाषेचे आणि इतिहासाचे संदर्भ असतात.

 डॉ. लवटे यांनी प्रस्तुत पुस्तकात डॉ. देवराज, दिनकर, मुक्तिबोध, राहुल सांकृत्यायन, विष्णु प्रभाकर आणि हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या विचारांचा परामर्श घेतला. त्यात मुक्तीबोध आणि दिनकर हे श्रेष्ठ कवि, जैनेंद्र कादंबरीकार तर विष्णु प्रभाकर नाटककार, डॉ. देवराज श्रेष्ठ दर्जाचे तत्त्वज्ञ तर डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी इतिहास व संस्कृतीचे थोर भाष्यकार व कादंबरीकार.

साहित्य आणि संस्कृती/४