पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भिन्नता नि विरोधांच्या सहप्रामाणिकतेचा सिद्धांत


 इथे प्रामाणिकता शब्दाचे दोन अर्थ गृहीत आहेत. (१) तर्कमूलक शक्यता (२) मूल्यात्मक ग्राह्यता अथवा स्वीकृती. सहप्रामाणिकता सिद्धान्त अथवा नियम दोन सम्बद्ध विधानांद्वारे स्पष्ट करता येऊ शकेल. पहिले विधान असे की, 'निर्णयात्मक शक्तीच्या एकाच स्थिती वा संदर्भात आपण प्रामाणिकपणे अशी कल्पना करू शकतो की एक व्यक्ती न केवळ भिन्न (Different) परंतु विरुद्ध (Contrary) पद्धतीने कार्य करून शकते. याचा अर्थ असा की मानव्य विद्याशाखांचे संशोधक मानवीय व्यवहारांचे विवरण वा व्याख्या करतात तेव्हा त्यांनी भिन्न आणि विरुद्ध प्रेरणांवर विश्वास ठेवायला हवा. अथवा या त्या गृहीत धरायला हव्यात. त्यांनी भविष्यासंबंधी भाकीत करताना या भिन्न आणि विपरीत प्रेरणा गृहीत धरायला पाहिजेत. दुसरे विधान असे की, एकाच परिस्थितीत सर्वसाधारण संवेदना तसेच कल्पनाशक्ती असलेल्या लोकांच्या बाबतीत भिन्न आणि विपरीत जीवनपद्धती वा व्यवहार अपेक्षित अथवा गृहीत मानायला हवा? पहिल्या विधानाच्या संदर्भात विचार करताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, कादंबरी वाचकाच्या मनात प्रारंभी अनिश्चित जिज्ञासा का असते? दुसरे असे की एका व्यक्तीत भिन्न परंतु विरुद्ध गोष्टींचे आकर्षण का असते ? उपरोक्त दोन्ही विधानांच्या संदर्भात अधिकांश लोक गृहीत मार्गापासून सर्वथा भिन्न मार्ग, प्रवृत्ती, आदर्श अचानक का आत्मसात करतात, हे समजून घेतले पाहिजे.

 माणसं एकाच परिस्थितीत व मूल्यांच्या संदर्भात परस्परविरुद्ध प्रतिक्रिया का देतात याची व्याख्या सहप्रामाणिकतेचा सिद्धांत करतो. घटितानंतरच्या प्रतिक्रिया संशोधकांना बुद्धिगम्य का वाटतात या बदलाची भविष्यवाणी करणे केवळ अशक्य. याचा अर्थ असा होतो की, माणसाचा मूल्याधिष्ठित व्यवहार हा मूलतः बुद्धिसंगत असतो. असे नसते तर मानववंश शास्त्रज्ञ अशा लोकांचा अभ्यासच करू शकले नसते. ज्यांची संस्कृती संशोधकांच्या संस्कृतीपेक्षा सर्वथा भिन्न होती. लोकांचे मूल्याधिष्ठित जीवन व्यवहार एका अर्थांनी आत्मनिष्ठच असतात, हे अमान्य करण्याचे काहीच कारण नाही.१५

साहित्य आणि संस्कृती/४५