Jump to content

पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठोस असे निर्णयात्मक अथवा निष्कर्षात्मक ज्ञान प्राप्त करू शकतात. इथे हे मोकळेपणाने मान्य केले पाहिजे की मानव्य विद्याशाखांतील अनुभवजन्य कल्पनामूलक (Empirico - imaginative) नियम अथवा सिद्धांतांची खात्री गुणात्मक असते, भले ती मोजमापावर आधारलेली नसेल. अशा प्रकारच्या विज्ञानात गणिती मोजमाप पद्धती लावणे गैर असते. मानव्य विद्युत आकडे आणि व्यक्तिगत तसेच सामान्य इतिहासाचा अभ्यास हा मानवी मनाच्या अनुभव व वापरांच्या अनेक गुणात्मक शक्यतांची क्षितिजे निर्माण करत असतो, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे. मानव जीवनानुभव व अनुभूतीची साधने यांच्या गुणात्मक संबंधांचा अभ्यासच एका अर्थाने मानवीय विद्याशाखा करीत असतात.

 आदर्शवादी विज्ञानांची तत्त्वे मानसशास्त्रीय, सौंदर्यसंबंधी व नैतिक पसंतीवर आधारित असतात. खरं तर पसंती, नापसंती ही मानवी वृत्तीत असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाची विचार व तर्क करण्याची पद्धत वेगळी असते. मूल्यांच्या संदर्भात हे पाहू लागू तर लक्षात येईल की, माणसागणिक यातील अंतर आकाश पाताळाइतके भिन्न असते. या भिन्नतेची दोन कारणे असतात. त्यातले एक असे की माणूस ज्या कल्पना व मूल्यांना कवटाळतो त्यांचे यथार्थ ज्ञान त्याला असत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर जैनधर्मातील साधूच्या केशलोचनाचे देता येईल. मोक्ष प्राप्तीसाठी जैन साधू केशलोचन करतात. त्यात त्यांना ज्या यातना सोसाव्या लागतात त्या सामान्य माणसाच्या लेखी रोमांचकारकच! पण जर आपण या व्यवहाराशी असहमत असू तर केशलोचन विधी आपणास तितका प्रशंसनीय वाटणार नाही जितका जैन धर्म अनुयायांना वाटतो. या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आत्मनियंत्रण व वेदना सहन करण्याचा संयम या दोन्ही गोष्टी व्यक्तिमत्त्व विकासात गुणात्मक उन्नती करत असतात. या दृष्टीने केशलोचन प्रशंसनीय मानता येईल. दुसरी गोष्ट मूल्यदृष्टी भेदाची. अनेक माणसे अनेक प्रकारे सुखी, दु:खी होऊ शकतात. त्यामुळे माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की सुखी, दु:खी होण्याचे वास्तव कारण कोणते ? सुख, दु:खाचे व्यक्तिगत वा व्यक्तिमत्त्व संबंधी रूप तसे गौणच. खरी गोष्ट अशी आहे की मानवी जीवनातले ते मूल्य भान महत्त्वाचे, जे सर्जनशील कल्पनेद्वारे माणसाचा आत्मिक विकास घडवून आणते. बाह्याचारापेक्षा आंतरिक बदल केव्हाही श्रेष्ठच.

साहित्य आणि संस्कृती/४४