पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानवीय विद्याशाखांना प्रभावित करून त्यांना विविध रूप, गुण, वैशिष्ट्ये बहाल करत असते.

वस्तुनिष्ठतेचा अर्थ


 जगातील वेगवेगळ्या वस्तूंना मनुष्य वस्तुनिष्ठपणे स्वीकारतो; त्याच्या बुद्धीनुसार ह्या वस्तू सार्थक असतात. माणसात वसलेल्या नि असलेल्या वेगवेगळ्या अभिरुची व उपयोग-भानामुळे तो या वस्तूंना अनेक रूपांनी पाहतो. एकच वस्तू माणसास वेगवेगळ्या वेळी नि प्रसंगी भिन्न दिसते, भासते किंवा वस्तूतिल विभिन्न प्रकारची मूल्यवत्तता माणसास प्रतीत होते. या उलट माणसास भिन्न वस्तूत समान भावाचेही दर्शन होते वा अनुभूती येते. उदाहरण द्यायचे झाले तर सिंह किंवा मगरीचे देता येईल. प्राणी संग्रहालयात माणूस जेव्हा या प्राण्यांना पाहतो, तेव्हा त्याच्यासाठी ते सौंदर्य आस्वादक असतात पण तेच प्राणी तो जंगलात वा नदी, तलावाकाठी पाहतो तेव्हा भयभीत होतो. तीच गोष्ट एखादी वस्तू आपणास विकायची असेल वा खरेदी करायची असेल तेव्हा धातूची नाणी वा कागदी नोटा दोन्हींचे मूल्य आपल्या लेखी एकच असते. धातू नि कागद रूपे वेगळी पण मूल्य, अर्थ एकच. आणखी एक गोष्ट अशी की एकच वस्तू विभिन्न लोक विभिन्न वेळी वेगवेगळ्या रूपात पाहतात वा स्वीकारतात. उदाहरणार्थ, - एका शांतीप्रेमी (Pacifist) माणसाची कृती एका माणसास बुद्धिविरोधी वा देशभक्ती विरोधी वाटते तीच कृती दुस-या व्यक्तीस मात्र योग्य, उदात्त व मानवोचित प्रतीत होते. मोक्ष प्राप्त करू इच्छिणाच्या संन्यासी वा संतास सोने नगण्य वाटते. गणिताचे कोष्टक गणितीस मूल्यवान तर कवीस निरर्थक वाटू शकते.

 याचा अर्थ असा होत नाही का की वस्तूंचे आपण जे मूल्य करतो वा मानतो ते व्यक्तिसापेक्ष अथवा आत्मनिष्ठ असते. या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर सांगता येईल की आत्मनिष्ठता ही अनुभूतीसापेक्ष असते. एखादे वैज्ञानिक यंत्र जसे मोजमाप (Reading) करते, तसेच मनुष्यही वस्तूचे मोजमाप, आकलन त्याच्या क्षमता, योग्यता, प्रतिभेच्या आधारे करत राहतो. कधी एक वस्तू त्याला गौण वाटते तर कधी महत्त्वाची. अशा स्थितीत सर्वच वस्तू खरे तर आत्मनिष्ठ वा व्यक्तिसापेक्ष होऊन जातात. त्यामुळे एक तर वस्तुनिष्ठ (Objective) व व्यक्तिनिष्ठ (Subjective) हा भेदच संपून जाण्याची शक्यता अधिक. त्यासाठी मग आपण वस्तुनिष्ठतेची व्याख्या

साहित्य आणि संस्कृती/४१