पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहतो. याचा हा जीवन उद्देश व्यक्तिगत स्वार्थापलीकडचा आहे. त्याचे मूळ माणसाच्या सौंदर्यासंबंधीच्या अपेक्षांमध्ये आहे. या उद्दिष्टाची परिपूर्ती करू इच्छिणारा कलाकार अथवा संशोधक त्या उद्दिष्टांच्या स्थूल उपयोगीतेबद्दल उदासीनच असतो. माणसाचे हे समष्टीगत उद्दिष्ट जीवन जगण्याच्या प्रेरणेची दुसरी बाजू आहे. ती त्याच्या आत्मिकतेचे उन्नयन असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

 आत्तापर्यंत आपण ‘मानवकेंद्रित' असणे म्हणजे काय ते समजून घेतले. आता आपण सर्जनात्मक मानवतेचा दुसरा घटक म्हणजे मनुष्य सर्जनशील प्राणी आहे' तो कसा हे समजून घेऊ. माणसाचे सर्जनशीतलत्व आत्मानुभूतीनेच प्रत्ययाला येते. ते आता आपण मान्यतेच्या रूपात (Postulate) समजून घेऊ. माणूस सर्जनशील पध्दतीने स्वत: एखादी गोष्ट निश्चित करतो, निर्णय अथवा निष्कर्षास येतो. ही गोष्ट कदाचित कठोर तर्कपद्धतीने नाही सिद्ध करता येणार. माणूस उपयोगी, अनुपयोगी अथवा सांस्कृतिक अशा दोन्ही पातळ्यांवर सर्जनशील असतो. ती सृजनशीलता खालील रूपात प्रकट होत असते.

 (क) मनुष्य निसर्गाच्या चक्रात आपल्या उपयुक्ततेनुसार तसेच सौंदर्यमूलक उद्दिष्टांनुरूप परिवर्तन व संगठन करून आपल्या सर्जनशीलतेस सिद्ध करत असतो. अशा प्रकारची सर्जनशीलता सूक्ष्म जीवजंतूंमध्येही असते. उदाहरणार्थ- चिमणी घरटे बनवते. जेव्हा एखादा जीव वा प्राणी निर्सगचक्र भेदून नवी रचना करतो, तेव्हा त्याची ती तोडफोड, बदल, परिवर्तनाची कृती सर्जनात्मकच असते. आज निर्माण झालेली नगरे भले ती कृत्रिम असोत, पण तिथे मनुष्याचा रहिवास आहेच. ही नगर निर्मितीही एका सृजनच होय. निसर्गात माणसाने केलेल्या हस्तक्षेपातून तर वर्तमान नवी सृष्टी, समाज उदयला आला आहे, अन्यथा ते शक्य नव्हते.

 (ख) मनुष्य ज्या परिसर वा पर्यावरणात राहतो त्यास तो एक सार्थक जीवनक्रम वा व्यवस्था (Meaningful Order) म्हणून स्वीकारत असतो. तो ज्या वस्तू वा व्यवस्था वापरतो उदाहरणार्थ, सोने, नाणे, नोटा इ. त्या संदर्भातील त्याच्या प्रतिक्रिया प्रसंगापरत्वे भिन्न भिन्न असतात. तात्पर्य असे की, वस्तू अथवा घटनांबद्दल माणसाची प्रतिक्रिया एकच एक यांत्रिक न राहता तिच्यात वैविध्य आढळते. ही परिवर्तनशीलता विभिन्न प्रसंगी विभिन्न रूपात आढळते. मनुष्य गरजेनुरूप क्रिया, प्रतिक्रिया व्यवस्था, संगठन आदींची निर्मिती करत असतो.

साहित्य आणि संस्कृती/३६