पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्दिष्टांसंदर्भात आपण पाहू लागलो तर असे दिसते की त्यापैकी कुणा एकास आपणास वैज्ञानिक वा तर्कमूलक पद्धतीने बुद्धिसंगत नाही सिद्ध करता येणार. उदाहरण देऊन सांगायचे झाले तर आपणास कोणा सजीवाची स्वस्थ स्थिती अथवा मानव अस्तित्वाच्या रूपात त्याची स्थिरता अशा अपेक्षित गोष्टींसाठीचे प्रयत्न नाही वर्णन करता येणार. साधनांचे वर्णन करणाच्या धारणा मानवी उद्दिष्टांशी असंबद्ध असतात असे सिद्ध करता येत नाही. उदाहरणार्थ, घटक, प्रमाण, वजन, अंतर, वेग इ. चा मानव उद्दिष्टांशी असलेला संबंध भौतिक पद्धतीने सिद्ध करता येणे अशक्य आहे. निसर्ग घटकांच्या वर्णनात ते शक्य असते, कारण तिथे वस्तू, पदार्थांचे स्थानांतरण शक्य असते.

 माणसांचे सारे ज्ञान उद्दिष्टसापेक्ष वा प्रयोजनमूलक आहे. या विधानाचा अर्थ असा नाही की मनुष्य वस्तुनिष्ठ, तटस्थ शोध घेऊच शकत नाही. आमचा असा निष्कर्ष आहे की या संबंधात परंपरागत व्यवहारवादाचा (Pragmatism) सिद्धांत भ्रामक विचारधारेचा अपराधी राहिला आहे. हे ठीक आहे की माणूस वेग (Speed) या स्थितीबद्दल जी जाणीव व्यक्त करतो त्याचा संबंध त्याच्या उद्दिष्ट वा उपयोगाबद्दल आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की ध्वनी, प्रकाश इत्यादींचा वेग निश्चित करणाच्या संशोधक, वैज्ञानिकांवर व्यक्तिगत उपयोग वा उद्दिष्टांचा प्रभाव असतो. या लेखकाच्या मतानुसार, सर्व प्रकारच्या उच्च सांस्कृतिक क्रियांसंदर्भात, ज्या फक्त व्यक्तिगत निरुपयोगी आहेत, त्याबद्दल निश्चितच उदासीनता असते. या दृष्टीने पाहता वैज्ञानिक शोध, संशोधन वा तत्त्वचिंतनपण व्यक्तिगत उपयोगाचे आणि उद्दिष्टांचे अतिक्रमण करत असते. हे योग्यच आहे की मानवीय ज्ञान अनिवार्यतः त्या बौद्धिक साच्यात बसवले जातात, ज्यांचे रूप, स्वरूप मानवीय उद्दिष्टांनुसार वर्णिले जात असते; पण उदिष्टांचा संबंध माणूस नामक जीवयोनीच्या सामान्य रचनेशी असतो, संशोधकांच्या व्यक्तिगत स्वार्थाशी त्याचा सुतराम संबंध असत नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

 आमच्या आणि व्यवहारवादी विचारधारेत फरक आहे. व्यवहारवादी जीवनउद्दिष्टाचा अर्थ स्वार्थ असा मानतात. खरे तर त्याचा संबंध जीवन अस्तित्व आणि सुरक्षेशी असतो. याच्या विरुध्द आमची अशी धारणा आहे की माणसाचे कितीतरी उद्देश हे विशुद्ध, आत्मिक आणि आध्यात्मिक असतात. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर माणूस आपल्या अनुभवांना आत्मसंगत बौद्धिक समूहात उतरवू इच्छितो. तो या सर्व अनुभवांना सामूहिक रूप देऊ

साहित्य आणि संस्कृती/३५