Jump to content

पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुभवाच्या, जाणिवेच्या पलीकडच्या आहेत, त्यांना सर्जनात्मक मानवतावादात थारा नाही. परंतु याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, हे तत्त्वज्ञान धर्मविरोधी आहे. आमच्या मतानुसार धर्म, अध्यात्म या मानवीय अनुभूतीच्या गोष्टी आहेत. विशेषतः आध्यात्मिक अनुभूती ही माणसाची सर्वश्रेष्ठ अनुभूती होय. पण आमचा विश्वास आहे की अनुभूती मानवीच असायला हवी, ती बुद्धिगम्य हवी. आध्यात्मिक अनुभूतीत दोन घटक अंतर्भूत असतात. एक सर्व प्रकारच्या सीमित व नश्वर पदार्थांप्रती वैराग्य भावना आणि दुसरी म्हणजे अशी आस्था की ज्यात मानवी जीवनाची परिणती आहे, जित अनंत सार्थकतेचे मूल्य सामावलेले आहे. सर्व प्रकारच्या उच्च सांस्कृतिक क्रियात धार्मिक उदासीनता तसेच रहस्यपूर्ण उच्च ध्येयप्रत आकर्षणाचा अंश असतो. या गोष्टी खोल नि तीव्र आदर्शोन्मुख (Platonic) प्रेमानुभूतीतही आढळतात. आपल्या अस्तित्वाचा कल्पनामूल्य विस्तार करून सर्वसाधारणतः सर्व देश नि काळातील रहस्यवादी प्रेम, अनुभूती वा जाणिवेच्या अंगाने समजदार, प्रगल्भ आहेत.

 तिसरी गोष्ट अशी की, मानवकेंद्रित वर्णन आणखी एका गोष्टीवर प्रकाश टाकत असते. सर्व त-हेचे शास्त्रोक्त व संगत ज्ञान हे मानव अभिरूची आणि उद्देशांवर आधारलेले असते आणि कोणतेही ज्ञान असे नसते की जे मानवीय अनुभूती तसेच कल्पनांच्या सीमा पार करते. या विचाराचा उत्तरार्ध वर आलाच आहे. आता पूर्वार्ध समजून घेऊया.

 सर्व प्रकारचे ज्ञान, विशेषतः संगठित व व्यवस्थित ज्ञान मानवीय अभिरूचीसापेक्ष असते. कदाचित माणसाची सर्वसाधारण संवेदना त्याच्या रूचीनुरूप किंवा उद्दिष्टानुरूप नसेल, परंतु त्याच्या सर्व प्रकारच्या प्रतीकमूलक चिंतनक्रिया, सर्व प्रकारच्या जाणिवा, अनिवार्यतः त्याच्या एका किंवा दुस-या उद्दिष्टांशी खचितच संबंध ठेवून असतात. माणसाचे सारे संवाद आणि वर्णन हे उद्दिष्टसापेक्ष असते आणि उद्दिष्टांसंबंधी त्याच्या धारणा नि संवाद, वर्णनास काहीएक अर्थ असतो. भौतिक विज्ञानाचा बोध हा उद्दिष्टनिरपेक्ष असतो. असा जो अनुभव आपण घेत असतो, त्याचे कारण असे की, विज्ञानाचा संबंध साधनांशी असतो, साध्य नि लक्ष्याशी विज्ञानाचा असलेला संबंध दुरान्वयीच म्हणायला हवा. त्या अर्थाने विज्ञान हे वस्तुनिष्ठ (Objective) आणि बौद्धिक (Rational) असते. हा संबंध त्या अर्थाने स्पष्ट, बुद्धिसंगत, उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि उपयोगात आणली जाणारी साधने बुद्ध्यानुसारी असतात या अनुषंगानेच घेतला पाहिजे. जीवन

साहित्य आणि संस्कृती/३४