पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विषाक्त आहे. एकोणिसाव्या शतकाची अशी धारणा होती की मानवीय बुद्धी सत्यशोधनक्षम आहे. या विरुद्ध विसाव्या शतकात मात्र गतकालातील मानवीय बुद्धीवरचा विश्वास उडाल्यासारखी स्थिती निर्माण झाली खरी. आता असे मानण्यात येऊ लागले आहे की ज्या तत्त्व नि मूल्यांसाठी जगायचे त्या मूल्यांप्रत माणूस पोहोचूच शकत नाही. मूल्यांसंदर्भात कोणी काहीही म्हणा, ते व्यक्तिगत मत ठरते आहे खरे. याचा दुसरा अर्थ असा की अशी कोणतीही वस्तुनिष्ठ मूल्येच नाहीत की ज्यासाठी माणसांनी जगावे.

 मानव्यशास्त्राशी संलग्न सर्व ज्ञान, विद्याशाखांच्या आजच्या दुरवस्थेच्या कारणांचा सारासार विचार न करता ढोबळ पद्धतीने आज चिकित्सक मत व्यक्त करताना असे म्हणतात की ‘मानवीय विद्यांनी (Humanity) भौतिक विज्ञानाची शोध पद्धती अंगीकारली पाहिजे. ते भोळे लोक असे गृहीत धरतात की अशा वैज्ञानिक कार्यपद्धतींचा वापर करून मनुष्य स्वत:वर आणि आपल्या भविष्यावर नियंत्रण ठेवू शकेल.' वादासाठी असे क्षणभर गृहीत धरू की वजन, मापांद्वारे जीवन नीतींचे मोजमाप केले तर आदर्शामध्ये गुणात्मक फरक पडेल? आज जगातील सरकारे प्रेस, रेडिओ, पोलिसांच्या साहाय्याने आपल्या जनतेवर अपेक्षेपेक्षा अधिक बंधने नाही का घालत? मग मोजमापांनी काय फरक पडतो?

 आपण हे लक्षात घ्यायला हवे की संकटाचे स्वरूप हे गुणात्मक असते. त्याचे मोजमाप केवळ अशक्य! कारण ते संख्यात्मक नसते. त्यामुळे मूल्य बहिष्कारी प्रवृत्तीच्या साहाय्याने अथवा संख्यामूलक मोजमापाने, व्यापारी वृत्तीने मूल्यांचा प्रतिकार व प्रतिरोध करता येत नसतो. जोवर आपणास नैतिक मूल्यांचा मूल्यांकनासंबंधी ठोस परिणाम देता येणार नाही, तोवर मानवी गुणात्मक जाणीव, पक्षपात, त्यांचा तर्कमूलक व्यवहार आणि त्यांच्या नैतिक तसेच सौंदर्यासंबंधी धारणा, प्रतिक्रिया अनिवार्यतः यांत्रिक वा रासायनिक परिवर्तनासारख्या मापून, मोजून संख्यात्मक स्वरूपात सांगता येणार नाहीत. वर्तमान युगाची आणि खरे तर सर्व काळांची मुख्य समस्या हीच आहे की मानवी विवेक आणि क्षमता ज्या एका विशिष्ट पातळीवर उच्चतर, श्रेष्ठ ठरतात, ज्यांच्या आधारे आपण समाजात सामान्य आणि असामान्य असा भेद करतो, ती गुणवैशिष्ट्ये व त्यांची व्यवच्छेदक रूपे आणि प्रवृत्या कोणत्या नि त्या कशा जोखायच्या?

(२)

 प्रस्तुत ग्रंथाचा उद्देश संस्कृतीस मूल्य मानून तिचे वर्णन नि विश्लेषण

साहित्य आणि संस्कृती/३१