Jump to content

पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विश्वास ठेवत नाहीत जी इंद्रियागम्य असत नाही. तर्कमूलक भाववादानी स्वत:स एक वैज्ञानिक तत्त्वचिंतन! तत्त्वज्ञान म्हणून विकसित करून अशी घोषणा केली की जगात असे कोणतेही सत्य नाही जे वादातीत असते. तर्कमूलक भाववादाची आणखी एक धारणा आहे की सर्व वैज्ञानिक सिद्धांत वा शोध अस्थायी, कल्पानामात्र असतात. त्यात भविष्यकालीन नवीन शोधांनी दुरुस्त्या वा सुधारणा होत राहतात. अशा प्रकारे तर्कमूलक भाववादाच्या धारणेनुसार वैज्ञानिक सिद्धांत अंतिम असत नाहीत. विज्ञानाचे सारे सिद्धांत हे उपयुक्त कल्पनामात्र असतात. तर्कमूलक भाववादी वैज्ञानिकांच्या निसर्गसंबंधी अंतिम सत्य शोधाच्या कल्पनेस संशयाच्या दुर्बिणीतूनच पाहात आले आहेत. त्यामुळे त्यांची अशी पक्की धारणा आहे की, विज्ञानेतर नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्रासारखी विज्ञाने कोणत्याही प्रकारच्या सत्याच्या जवळपासही जात नाहीत. अशा प्रकारे तर्कमूलक भाववाद्यांचा अंतिम सत्यासंबंधीचा दृष्टिकोन हा निषेधात्मक नि निराशावादीच राहिला आहे. तर्कमूलक भाववादावर जेम्स इत्यादींच्या बुद्धिविरोधी विचारांचा मोठा पगडा आहे. इतकेच नव्हे, तर या विचारधारेचा बुद्धिव्यतिरिक्त अन्य क्षमता माणसात असतात, यावरही विश्वास नाही. जेम्स माणसाच्या कृतीशक्तीचे समर्थन करतो, तेही ते अमान्य करतात. तर्कमूलक भाववादाची अशी स्पष्ट धारणा आहे की, प्रत्येक वादाच्या प्रसंगात आमची कसोटी इंद्रियानुभूतीच होय. इंद्रियानुभूती समर्थक हे तत्त्वज्ञ ह्यूमप्रमाणे सार्वभौमिक सिद्धांतांना सत्या (Synthetic Necessary Proposition) च्या शक्यतेस नकारच देत आले आहेत.

 फ्रॉयडीय विचारधारा अशीच एक दुसरी बुद्धिविरोधी शाखा म्हणून ओळखली जाते. फ्रॉईडच्या मतानुसार आपले अधिकांश तर्क हे आवेग संचालित/नियंत्रित असतात. आपण बहुधा आपल्या आंतरिक पक्षपाताच्या समर्थनार्थ तर्क करीत असतो. हा तर्क कधीच वस्तुनिष्ठ सत्यासाठी नसतो. आणि म्हणून सत्यप्राप्तीसाठी आपणास कधीच बुद्धीवर अवलंबून राहता येणार नाही.

 आपण काही काळ शांत राहून या निष्कर्षांवर थंड डोक्याने विचार करायला हवा. तर्कमूलक भाववादानुसार आपण निसर्गाचे कामचलाऊ ज्ञानच प्राप्त करू शकतो. अशा पाश्र्वभूमीवर जीवमूल्यांसारख्या जीवनावर गंभीर परिणाम करणाच्या तत्त्वांसंदर्भात प्राथमिक आकलनही करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. फ्रॉईडच्या मतानुसार मानवी चरित्र हे

साहित्य आणि संस्कृती/२९