पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानसशास्त्रातील त्या सिद्धांतासारखी असतात, ज्यात सांगितले गेले आहे की, मानसिक स्वास्थ्यासंदर्भात आपल्या जागृत वृत्तीपेक्षा अजागृत वृत्ती वा भावना अधिक सक्रिय व महत्त्वाच्या असतात. इथे ज्या संकटांचा उल्लेख होतो आहे, ती मुख्यतः माणसाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित होत. ही अशी संकटे असतात की माणूस ज्यांची कल्पना करू शकत नाही. ती करणे त्याच्या आवाक्याबाहेरची असतात, परंतु ती त्याच्या आस्थापूर्वक जीवन सार्थकतेस व प्रयोजनास मात्र नेहमी आव्हान देत उभी ठाकलेली असतात. जेव्हा मानवीय कल्पना अनिश्चित आणि संभ्रमित असतात, त्या निर्माणक्षम राहात नाहीत, तेव्हा संकटजन्य परिस्थिती निर्माण होत असते. सर्जनात्मक कल्पना महत्त्वाकांक्षी माणसांसमोर नेहमी श्रेष्ठ, उच्च असे जीवनरूप ठेवत असते. असे जीवनरूप जे आदर्श असेल. शिवाय समकालीन विचारधारांद्वारे त्यांचे समर्थन व अनुकरण होऊन त्या वर्तमानातील महान विभूती त्यांचे अनुसरण करतील असं आदर्श नसल्यानेच माणसांचे जीवन दिशाहीन, निरर्थक आणि कंटाळवाणे बनून जाते. अशा प्रकारचा मनस्वी आंतरिक कंटाळा हा आजच्या माणसाचा खरा आजार वा रोग आहे. आजच्या काळच्या बुद्धिजीवी अथवा संवेदनशील लोकांपुढे अस जीवन ध्येय नाही की जे त्यांच्या उच्चतम आत्मिक शक्ती वा क्षमतांना आव्हान करेल व त्यात त्यांना सक्रिय ठेवेल. अशा प्रकारच्या ध्येय नि उद्दिष्टांअभावी माणसाचे प्रयत्न जगणे निष्फळ ठरत आहे. त्याचे यश त्याला न आत्मिक समाधान देते, न आत्मिक भावना त्याला कृतकृत्यतेचा आनंद देतात.

 असे नसते की माणूस फक्त वर्तमान संकटांनी ग्रस्त असतो तर तो संभाव्य संकटांबद्दलही तितकाच सचिंत नि असुरक्षितपणा अनुभवत राहतो. रोजचं जीवन सुरक्षित नि सुरळीत असावे अशी त्याची अपेक्षा असते. परंतु त्यापेक्षाही एक वेगळी अपेक्षा तो बाळगून असतो, ती म्हणजे त्याचे रोजचे जीवन अनपेक्षित यश नि समाधानाने भरलेले असावे, असे त्यास वाटत असते. “ठेविले अनंते तैसेचि रहावे। असू द्यावे समाधान।।" किंवा 'असेल हरी तर देईल खाटल्यावरि।' असा तो स्थितीशील, समाधानी नसतो तर ‘रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे' अशा आकांक्षेतून तो निरंतर सर्जनात्मक प्रगती व यश प्राप्त करत असतो. हे लक्षात घेता संकटाची व्याख्या 'निरंतर सर्जनशीलता' अशीच करावी लागेल. अशी कोणतीही स्थिती जी आपणास बुद्धी वा कल्पनेची सर्जनात्मकता देण्यास असमर्थ असते तिला संकटग्रस्तच म्हटले पाहिजे. सर्जनशील शक्तींचा विरोध तेव्हा अत्यंत आक्षेपार्ह मानायला

साहित्य आणि संस्कृती/२४