पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतात. शिवाय परिवर्तनाचा मानदंडही मानव वा मानव जीवनच असतो. ही भूमिका विस्ताराने कळावी म्हणून त्यांच्या उपरोक्त ग्रंथाच्या ‘भूमिका' या पहिल्या प्रकरणाचे हे भाषांतर. एक गोष्ट मला नम्रपणे कबूल केली पाहिजे ती अशी की हा समग्र ग्रंथ वाचताना आकळण्याची माझी मर्यादा लक्षात आली, म्हणून मी ग्रंथ परिचयाऐवजी भूमिकेच्या भाषांतराचा खुश्कीचा मार्ग अवलंबिला. त्याबद्दल क्षमस्व!


भूमिका

वर्तमान सांस्कृतिक संकट

डॉ. देवराज


 आजचा माणूस एक कठीण व व्यापक अशा संकटात सापडला आहे. या संकटाचे (Crisis) स्वरूप व कारण कोणते? संकटाच्या स्वरूपाच्या मुळाशी दोन संबंद्ध मन:स्थिती असतात.पैकी एक बौद्धिक संभ्रम आणि दुसरी असते असुरक्षिततेची भावना.संकटाची जाणीव केवळ त्यांनाच होते ज्यांच्यात कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता असते.अन्य प्राणी जीवनात असाधारण परिस्थिती निर्माण झाली वा संकट कोसळले तरच ते बहुधा त्रस्त नि भयभीत होतात.माणसांपैकी बहधा त्यांनाच संभाव्य संकटांची जाणीव होते.ते असाधारण बुद्धिमान वा संवेदनशील असतात.संकट दोन प्रकारची असतात.एक प्रकारचे संकट तेव्हा ओढावते जेव्हा संकट येणार हे माहीत असूनही माणसाची बुद्धी आणि कल्पना ते दूर करण्याचा उपाय योजत नाही.आजच्या जगात युद्धांचे संकट अशा स्वरूपाचे आहे.ही युद्धे स्वत:सोबत असंख्य अपरिमित कष्ट व भय घेऊन येत असतात.आज अशी संकटे घर करून आहेत.आज जगातील लोकांनी हे गृहीतच धरले आहे की युद्धेही होणारच.जरी काही थोरांच्या प्रयत्नांना यश येऊन ती टळू शकतील अशी शक्यता असूनही उपरोक्त गृहीत मनी वसलेले आढळते.आज माणसे युद्ध शक्यतांना दैवी कोप मानून काळ कंठत आहेत, हे मात्र खरे.ही गंभीर सामाजिक स्थिती होय.

 दुस-या प्रकारचे संकट मात्र वरील संकटाइतके अनपेक्षित नसले तरी गंभीर असते. ते अपेक्षित असून त्याची गंभीरता कमी होत नाही. कारण आपण याचं स्वरूप आणि व्यापकता समजू शकत नसतो. ही संकटे

साहित्य आणि संस्कृती/२३