पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वरूपात पुढे आणण्याची त्यांची स्वत:ची अशी प्रतीकात्मक लेखन शैली आहे. त्यांच्या प्रारंभीच्या चिंतनावर शंकराचार्यांचा प्रभाव होता. पण त्यांच्या लेखनाचा विचार, विस्तार, विकास होत गेला, तसे ते प्रथम जर्मन तत्त्वज्ञ कांटशी, नंतर बौद्ध तत्त्व चिंतनाशी जोडले गेले. डॉ. देवराज हे उपजत मानवतावादी तत्त्वचिंतक होत. त्यांच्या संस्कृति का दार्शनिक विवेचन ग्रंथात त्यांनी लिहिलेला ‘भूमिका' अध्याय त्यांच्या ‘सर्जनात्मक मानवतावाद' ची ओळख करून देण्यास पुरेसा आहे. जिज्ञासू मूळ ग्रंथ मिळवून मग वाचतीलच. याची मला खात्री आहे.

 ‘संस्कृति का दार्शनिक विवेचन' ग्रंथ डॉ. देवराज यांनी आपल्या ‘सर्जनात्मक मानवतावाद' या तत्त्वज्ञानाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने लिहिला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी, करता यावी असे वाटणाच्या उत्तर प्रदेश सरकारने ३00 मौलिक ग्रंथ प्रकाशनाची महत्त्वाकांक्षी योजना सन १९५० च्या दरम्यान कार्यान्वित केली होती, त्यातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ होय. डॉ. देवराजांनी हा ग्रंथ तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना समर्पित करून त्यांच्यातील देशभक्त लेखक आणि नीतिज्ञास मानवंदनाच दिली आहे. हा ग्रंथ आपणास ‘सर्जनात्मक मानवतावाद' समजावतो. आजवर अनेक तत्वचिंतक, इतिहासकारांनी विविध संस्कृती, त्यांची स्थित्यंतरे, स्वरूप या पैलूंबद्दल विस्ताराने लिहिले आहे. पण संस्कृतीचे तत्त्वज्ञान अपवादाने लिहिणा-या टॉमस हिल ग्रीन, एफ. एच. बँडले, (इंग्लंड), जोशिया राइस, (अमेरिका) के. बी. क्रोचे (इटली), विंडेल बँड, रिकॉर्ट, युकेन (जर्मनी) यांच्यासारख्या हिगेल समर्थक बुद्धिवाद्यांच्या पठडीतून नवे अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालणारे तत्त्वज्ञानी उदयाला आले त्यांच्या डॉ. देवराज त्या पंथातले बुद्धिवादी (Rationalistic) म्हणून त्यांना ओळखले जाते ते नवचिंतनामुळेच!

 डॉ. देवराज ‘संस्कृति का दार्शनिक विवेचन' ग्रंथामध्ये संस्कृतीस मूल्य मानून तिचे विश्लेषण करतात. सर्जनात्मक मानवतावाद हे मानवकेंद्रित तत्त्वज्ञान आहे. यात पारलौकिक विचारास थारा नाही. तसेच केवळ भौतिक म्हणजे जीवन असे मानत नाही. सर्व प्रकारच्या व्यवस्था, संगठन, मानवीय रुची, जीवनोद्देश यांचा हे तत्त्वज्ञान विचार करते. मानव सर्जनशील असतो. यावर या तत्त्वज्ञानाचा विश्वास आहे. संस्कृती ही मानवी निर्मिती आहे ती नैसर्गिक, वा प्राकृतिक नाही. संस्कृती उपयोगात्मक व सौंदर्यामूलक असते. ती प्रयोजनक्षम म्हणून परिवर्तनशील असते. तिच्यातील बदल मानव निर्मित

साहित्य आणि संस्कृती/२२