पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भाषिक, साहित्यिक व्यवहारांचे आणखी एक क्षेत्र म्हणजे प्रकाशनव्यवसाय, भाषा व साहित्य अभिरुची विकसित करण्याचे कार्य भाषिक प्रकाशन संस्था करतात. त्या सर्व भारतभर आपले साहित्य पोहोचवतात. तीच गोष्ट चित्रपट, प्रसारमाध्यमे (इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित), वृत्तपत्रसृष्टी व नियतकालिकांचीही. प्रांतीय भाषा या अन्य प्रांतांच्या आकर्षणाचे केंद्र बनल्या असे सहसा दिसून येत नाही. यादरम्यान एक झाले की, काही प्रांतीय भाषांतील साहित्याचे विशिष्ट प्रवाह अन्य भाषांचे आकर्षण बनले. उदाहरण द्यायचे झाले तर, मराठी नाटक व दलित साहित्याची मोहिनी हिंदीवर दिसते. बंगाली कथा-कादंब-यांचे आकर्षण सर्व भारतीय भाषांत दिसते. पण उपखंडसदृश भारतात ज्या बावीस घटनात्मक राज्यभाषा आहेत, त्यात भाषांतराशिवाय देवाण-घेवाण अपवादात्मकच. म्हणजे बहुभाषी कवी संमेलन, बहुभाषी साहित्य संमेलन, बहुभाषी चर्चासत्रे, बहुभाषी समीक्षा मंच, बहुभाषी प्रकाशक, बहुभाषी विद्यापीठे (यांची शीर्षके बहुभाषीऐवजी ‘भारतीय करता येणे शक्य आहे) असे उपक्रम अपवाद. राष्ट्रीय पुस्तक मेळा, विश्व पुस्तक मेळ्यामध्ये तर प्रांतिक भाषांची उपस्थिती सूर्यापुढे काजवा अशीच दिसते. प्रगती मैदानावरील वर्ल्ड बुक फेअरमधील भारतीय भाषांची (हिंदी, उर्दू, पंजाबी, बंगाली, मल्याळम् इत्यादी वगळता) उपस्थिती उत्साहजनक नसते. जी असते, ती त्या प्रांतिक भाषेचे प्रातिनिधिक रूप व्यक्त करायलाही अपुरीच ठरत असते. तिथेही इंग्रजीचे वर्चस्व डोळ्यात भरत असते.

 भाषिक व्यवहाराची माहिती व तंत्रज्ञान युगातील साधने म्हणजे संगणक, लॅपटॉप, किंडल्स, मोबाईल्स ही साधने खरे तर बहुभाषी उपयोगाने मूलतः (बायडिफॉल्ट) युक्त असतात. उदाहरणार्थ - इंटरनेटवरील गुगल सव्हें इंजीनवरील माहिती हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली, तामिळ, मल्याळम्, गुजराती, पंजाबी भाषेत उपलब्ध असते. प्रयोगक या प्रांतिक भाषेऐवजी संगणक व मोबाईल्सवर इंग्रजी अधिक वापरतात. हे सर्व मी सांगतो ती इंग्रजीविरुद्धची तक्रार नसून, भाषिक वापराची वस्तुस्थिती मला लक्षात आणून द्यायची आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतात ८८० छोट्यामोठ्या भाषा बोलल्या जातात. त्यातील ७८० तर नोंदणीकृत भाषा होत. पण प्रांतिक वा स्थानिक भाषा लुप्त व्हायचे (नष्ट व्हायचे) प्रमाणे मोठे आहे. ही प्रवृत्ती/स्थिती जगात सर्वत्र दिसते. सन १९६१ पासून पाहिले, तरी २२० भाषा लुप्त झालेल्या दिसतील. अशा स्थितीत स्थानिक, प्रांतिक वा देशी भाषा जगवायच्या; तर भाषावापर व भाषा व्यवहार याच कसोटीवर

साहित्य आणि संस्कृती/१९१