देण्यात आले आहे. या विविध लेखांतून डॉ. द्विवेदींचा व्यापक व्यासंग लक्षात येतो. त्यांचे म्हणणे आहे की माणसाची मूल्यधारणा प्रवाही असते. या प्रवाहात संस्कृती काळाप्रमाणे नव्या शक्ती आत्मसात करते. अभिनिवेश मुक्त सांस्कृतिक आकलन व व्यवहारातच मानवी सभ्यतेचं हित सामावलेले आहे. बौद्ध धर्माचे अभ्यासक म्हणून डॉ. राहुल सांकृत्यायन यांचा लौकिक सर्वदूर पसरलेला आहे. त्यांना हिंदीपेक्षा भारतीय साहित्यिक म्हणावे असा अन्य अनेक भाषांचा त्यांचा अभ्यास आहे. संस्कृत, पाली, प्राकृत, अर्धमागधी, हिंदी, इंग्रजी असा त्यांचा व्यापक भाषिक व्यासंग त्यांना महापंडित सिद्ध करतो. त्यांनी लिहिलेला ‘बौद्ध संस्कृति' (१९५२) ग्रंथ एका अर्थाने बौद्ध धर्माच्या जागतिक प्रचार, प्रसाराचा इतिहास होय. पण त्यातून त्यांनी उभी केलेली बौद्ध संस्कृती आपणास हिंदू धर्माच्या कर्मकांडांपासून दूर नेणारी व मानवता भेदातीत करणारी म्हणून महत्त्वाची वाटते. हा ग्रंथ जागतिक संदर्भ वैविध्याने भरलेला असल्याने संस्कृतीविषय एक वैश्विक परिदृश्य हा ग्रंथ उभा करतो नि लक्षात येते की वैश्विक तेच शाश्वत!
जैनेंद्रकुमार हिंदी साहित्यात कथाकार, कादंबरीकार म्हणून जितके महत्त्वाचे तितकेच गांधीवादी विचारवंत म्हणूनही. ‘समय और हम' (१९६२) हा ग्रंथ संस्कृतीविषयक नवे भान देणारा म्हणून महत्त्वाचा. अधिकांशांची धारणा असते की संस्कृती म्हणजे भूतकाळाचे प्रतिबिंब. पण ते वर्तमानाचे वास्तव चित्र असते असे नवे भान हा ग्रंथ देतो. वर्तमानातला मनुष्याचा काम, विज्ञान, साहित्य, भाषाविषयक व्यवहार संस्कृतीच सांगत असतो हे त्यांनी समजावले आहे. जैनेंद्रकुमारांचे समकालीन साहित्यिक विष्णु प्रभाकर कथा, कादंबरी शिवाय नाटक, एकांकी, आठवणी, आत्मचरित्र लिहिणारे म्हणून समग्र लेखक. त्यांच्या ‘जन, समाज और संस्कृति' (१९८६) आणि ‘संस्कृति क्या है?' (२०१५) या दोन ग्रंथांतून स्पष्ट होते की वर्तमान संस्कृती संकट हे चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूची आठवण करून देणारे आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचे वरदान त्याला आकर्षित करते खरे पण त्यांच्याच अभिशापाने त्याचा जीव गुदमरतो आहे. मानवी विकासाचा प्रारंभ अशाच संभ्रमाने झालेला. अॅडाम आणि ईव्हच्या कथेतले सफरचंद सर्वांना माहीत आहे. प्रलोभन व पश्चात्ताप या मानवी जीवनरूपी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. महाभारतातला अभिमन्यू मारला गेला, पण वर्तमानातला अभिमन्यू मरणार नाही. कारण तो मृत्युंजयी संस्कृतीचा-वैश्विक संस्कृतीचा समर्थक व उपासक आहे, हा विष्णु प्रभाकरांचा आत्मविश्वास या ग्रंथास वर्तमानाची