पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याविरुद्ध साहित्य आणि कला मात्र मानवात्म्याची मुक्त, निबंध अभिव्यक्ती असते. मुक्त अभिव्यक्तीचा अर्थ उच्छृखलता किंवा बेजबाबदारपणा नव्हे! जबाबदारीचा अंकुश कलाकाराच्या अंतःप्रेरणा नि प्रतिभेतून येत असतो. खरं तर सच्चा कलाकार सत्तेचा अंकुश न स्वीकारता तो झुगारण्यातच इतिकर्तव्यता मानत असतो. त्याचं खरं कारण कलाकार कॉम्प्युटर असत नाही, हेच आहे. साहित्य आणि कलेचे खरे उपासक ब-याचदा व्यवस्था विरोधी वृत्तीचे असतात. सत्तेचे संरक्षक अशा स्वभाव वृत्तीचे नसतात. जर अशा साहित्यिक वा कलाकाराला सत्तेच्या संरक्षण कवचाची गरज भासेल तर तो सत्ता समर्थकच राहणार, हे उघड आहे. जर तो सत्ता-रक्षित राहील तर सत्तेचं त्याच्यावर वर्चस्व राहणार, हे उघड आहे. अशा परिस्थितीत त्याची अभिव्यक्तीमुक्त राहणे अशक्य. ती मिंधीच असणार. कला आणि कलाकारावर सत्तेचा घातक परिणाम नि प्रभाव राहणार हेही उघड आहे.

 सत्ता आणि संस्कृतीतील हा मूलभूत फरक त्यांना परस्परात कधी एक होऊ देत नसतो. कधी कधी असंही होतं की कलाकाराची मुक्त, निबंध अभिव्यक्ती सत्तेस पसंत असते व ती त्याला संरक्षण देते. परंतु जर तो खरा कलाकार असेल तर असे संरक्षण स्वीकारून तो सत्तेच्या वळचणीत विसावणार नाही किंवा उपकृत होणार नाही. तो सत्तेचा सन्मान व पुरस्कारही स्वीकारणार नाही. कारण तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे अंकुश ठेवण्याचेच कार्य करत असतात. माझे असे म्हणणे नाही की सत्तेने कलाकार वा साहित्यकारास सन्मानित करू नये. पण त्याचा सत्तेचा राजकारणाशी संबंध असता कामा नये. कारण ब-याचदा असे उद्योग करून सत्ता स्वतःच्या संरक्षण व पोषणाची प्रमाणपत्रे मिळवत असते. कधी कधी अपवादाने का असेना, सत्ता काही कृती करते, जेणेकरून तिची निष्पक्षता सिद्ध होते. ती हे कार्य कधी प्रामाणिकपणे करते. तर कधी राजकीय चातुर्याने. चातुर्य हा सत्तेचा स्वभावधर्म होय, तो संस्कृतीचा असूच शकत नाही.

माझे असे म्हणणे नाही की ज्यांनी सत्तेचे संरक्षण अपेक्षिले नि स्वीकारले त्यांचे सांस्कृतिक क्षेत्रातले योगदान नगण्य वा कमी महत्त्वाचे आहे, महत्त्वहीन आहे. किंवा असेही नाही सत्ता नेहमी निरंकुश आणि मानवीय गुण वंचित असते.

 इतिहासात सर्व प्रकारची उदाहरणे आढळतात. चतुर प्रशासक याचा वापर आपल्या स्वार्थासाठी करून घेत असतो. सत्ता आणि संस्कृतीची राशी

साहित्य आणि संस्कृती/१८५