पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांनी नमूद केले आहे की, ‘विजेच्या कल्लोळाप्रमाणे अंधारात अचानक एका नव्या प्रकाशाचे अद्भुत दर्शन झाले. ते म्हणजे भक्ती आंदोलन." ते दोन रूपात अवतरले. पौराणिक अवतारात झालेला सगुण भक्ती मार्ग नि दुसरा नाथ योगींचा निर्गुण भक्ती मार्ग. सगुण भक्ती मार्गांनी हिंदू धर्मीय निष्प्राण कर्मकांडास आंतरिक प्रेमाची जोड दिली तर निर्गुण भक्तिधारेने कर्मकांडातील बाह्योपचारास फाटा देण्याचा प्रयत्न केला. एकाने समझोता केला तर दुस-याने विद्रोह करणे पसंत केले, एकाने शास्त्राचा आधार घेतला तर दुस-याने अनुभवाचा, एकाने श्रद्धा मार्गदर्शक मानली तर दुस-याने ज्ञानमार्ग पत्करला. एकाने सगुण, मूर्तिरूप ईश्वराची भक्ती स्वीकारली तर दुस-याने निर्गुण ईश्वर मान्य केला. पण प्रेमाला दोन्ही भक्ती मार्गांनी कवटाळले. कोरे ज्ञान दोघांनाही अमान्यच होते, केवळ कर्मकांड खरे तर दोघांनाही मान्य नव्हते. आंतरिक प्रेम दोघांनाही अपेक्षित होतं. निर्हेतुक भक्तीच दोघांना हवी असायची; परमेश्वराप्रति बिनशर्त समर्पणाचे दोघेही समर्थक होते! सर्वांत मोठे अंतर होते ते ईश्वरीय लीलेसंबंधाने. दोघांचा लीलेवर विश्वास होता. दोघांना वाटायचे की ईश्वर लीलेने हा भवसागर उभा आहे, तरता येतो तो त्यामुळेच. सगुण भक्त भजन, कीर्तनाद्वारे दुरून ईश्वर भक्ती करायचे. निर्गुण भक्तिवादी ईश्वरात लीन होऊन, सामावून एकात्म होऊ पाहात. निर्गुणी स्त्रीस माया मानत व भक्तीतला त्यांना तो अडथळा वाटायचा. म्हणून माया-मोहापासून दूर राहायची शिकवण ते देत राहायचे. सगुणांचा दोन्ही ईश्वर प्रियतम असायचा तर निर्गुण त्यांना पती संबोधत, दोन्हीत प्रेम, भक्तीची तीव्रता, आकर्षण, ओढ, समर्पण भाव, एकात्म होणे अभिप्रेत होते. भक्ती दोन्हींच्या लेखी अनुभवजन्यच असायची.

 कबीरदास आपल्या समकालीन सगुणसंत कवींपेक्षा वेगळे होते. सगुणी व निर्गुणी दोन्हींची साधना पद्धती ही प्रेम, भक्ती केंद्रितच होती. प्रेम, प्रणय, लीला, रास अशी काही नावे त्याला दिलीत तरी कबीर एका बाबतीत मात्र सर्वांपेक्षा निराळे होते. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे स्मृती, पुराणादी आधारावर भारतीय संतांची भिस्त असायची. परंपरा प्रमाण मानून ते भक्तीचे निरूपण करीत होते. सगुणोपासक तर परंपरावादीच म्हणायचे. 'बाबा वाक्यं प्रमाणम् असाच आविर्भाव होता. अशा पार्श्वभूमीवर कबीरदासांनी प्रवाहाविरुद्ध मार्ग पत्करला. कबीरदासांची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमीच भिन्न होती. ते जन्माने मुसलमान असून त्यांची भक्तिपद्धती हिंदूप्रवण होती. दुसरीकडे ते हिंदू असून नसल्यासारखे ते विचार व्यक्त करत होते. ते साधू होते पण

साहित्य आणि संस्कृती/१८०