पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जिज्ञासा वाढवतात. ब्रह्मदेशाच्या इहवादी प्रकाशनचं कार्य एक देश शब्दबद्ध करण्यात जसं आहे तसं त्या देशाची संस्कृती प्रतिबिंबित करण्यातूनही स्पष्ट होतं.

 विष्णु प्रभाकरांनी या ग्रंथात लिहिलेला ‘पं. नेहरू और उनकी संस्कृति' लेख नेहरूंचं संस्कृतीविषयक आकलन स्पष्ट करणारा आहे. नेहरू जन्मले भारतात, पण त्यांची वाढ विदेशात झाली. त्यामुळे त्यांचं सांस्कृतिक विश्व व्यामिश्र राहिलं. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, “मैं पूरब और पश्चिम का अनमोल मिश्रण हैं। शायद मैं पूरबी से अधिक पश्चिमी हूँ। मैं सब जगह पराया-पराया सा अनुभव करता हूँ। कहीं भी सहज घर जैसा नहीं पाता। फिर भी हिंदुस्तान की जमीन मुझसे चिपटी चली जाती है।" सहज घराला पारखे नेहरू पण त्यांचे देशाविषयीचे भविष्य मात्र दूरदर्शी होते. हा देश बहुसांस्कृतिक, बहुभाषी आहे. त्याचं ‘भारतीय' रूप विकसित करण्यावर त्यांचा भर होता. साहित्य, भाषा यांत भाषांतराचा सेतू बांधण्यासाठी किती उपक्रम केले. साहित्य अकादमी त्यापैकी एक होय. पण त्यांचे स्वतःचं साहित्य हा खरा त्यांचा सांस्कृतिक आरसा. तो विष्णू प्रभाकर या लेखातून दाखवतात. सत्ता के गलियारे में संस्कृति' लेख सत्ता व संस्कृतीचा अभिन्न संबंध दर्शविणारा. सत्ता आक्रमणशील असते तशी ती एकाधिकारीही असे. सत्ता उपजत अस्थिर असते. ती परिवर्तित होणारी असल्याने स्थानांतरण तिचा स्थायीभाव असतो. तिच्या संलग्न शासन संधिसाधू असतं. म्हणून ते सत्तेच्या शोषणाचा पहिला बळी ठरतं. सत्तेत सामील बुद्धिवंत यास अपवाद नसतात. मग ते प्रशासन अधिकारी असोत वा वळचणीत विसावणारे बुद्धिजीवी. जे स्वतंत्र, स्वप्रज्ञ कलाकार, साहित्यिक, बुद्धिजीवी असतात, ते खरे संस्कृतीचे संरक्षक व संवर्धक असतात. ते सत्ता विरोधी असतात. खरे कलाकार कॉम्प्युटर नसतात. ते कठपुतळीही असत नाहीत. ‘‘सत्ता और संस्कृति के स्वभाव का यह मूलभूत अंतर उन्हें एकरस नहीं होने दे सकता।' हा लेखकाचा निष्कर्ष वाचत असताना उगीचच ‘सहिष्णु’, ‘असहिष्णुता' चर्चा आठवत राहते व विवेचनाचं गांभीर्य लक्षात येते. प्रस्तुत लेख विचारमंथन म्हणून मननीय आहे. तो सत्ताधारी आणि बुद्धिजीवी दोघांनाही एकमेकांच्या भूमिका समजावत, सुरक्षित अंतर व संयमाची शिकवण देणारा म्हणून महत्वाचा वाटतो.

 विष्णू प्रभाकर हिंदी साहित्यातील जैनेंद्रकुमार दिनकर, महादेवींसारख्या

साहित्य आणि संस्कृती/१७३