पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रयत्न करते आहे. ती सांगते आहे की, “इहवादी विकासापेक्षा आत्मिक विकास श्रेष्ठ आहे. कारण त्यात सर्जनात्मक शक्ती नि क्षमता असते. तीच आज अपंग झाली आहे. ही अपंगता न्यूनगंड निर्माण करते. त्यातून जीवनाबद्दलची अनास्था जन्माला येते. ही अनास्था संस्कृतीविरोधी असते."

 संस्कृती आणि उत्पादनसंबंधी हा विचार हा मूलतः माक्र्सवादी विचारधारेच्या पायावर उभा आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. विष्णू प्रभाकरांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून उत्पादन साधने व वर्ग विचार याची सविस्तर चर्चा केली आहे. यासंबंधी मूळ माक्र्सवादी विचार बैठक स्पष्ट करून त्यासंबंधी डॉ. राधाकृष्णन, कॉम्रेड शिवदास घोष, बंगाली साहित्यकार शरतचंद्र चतर्जी, श्री मां (पुदुच्चेरी) प्रभृतींचे विविध दृष्टिकोन स्पष्ट केले आहेत. त्यामुळे उत्पादन साधने आणि संस्कृतीचा घनिष्ठ संबंध स्पष्ट होण्यास मोठे साहाय्य झाले आहे. विष्णू प्रभाकरांनी या संबंधी आपल्या एका मार्क्सवादी मित्राचा हवाला देत आपले मत मांडले आहे. लेखाच्या समारोपात त्यांनी व्यक्त केलेले विचार उत्पादन साधन व संस्कृती यांच्या परस्परपूरक संबंधांवर प्रकाश टाकतात. ते म्हणतात, “माक्र्सवादांतर्गत संस्कृतीमध्ये साहित्य, कला, विज्ञान आणि ज्ञानाचाही अंतर्भाव होतो. हे सर्व घटक माणसाची विचारधारा, भावबोध, सामाजिक विचार घडवत असतात. असे असले, तरी समाजपरिवर्तनाचा मूलाधार आर्थिकच असतो. या आर्थिक घटकात उत्पादनाबरोबर वितरणाचा विचार मूलभूत आहे, कारण वितरणातून शोषण, विषमता जन्मते आणि तिचा प्रभाव माणसाच्या जगण्याबरोबरच सांस्कृतिक धारणेवर होत असतो. अर्थकारणात अतिरिक्त गैर घटकही कार्यरत असतात, त्याकडे आपणास दुर्लक्ष करता येणार नाही. या दोन्ही पैकी कोणते कारण (उत्पादन व वितरण) भूमिका बजावते वा प्रभावकारी ठरते यावर समाजाची आर्थिक, राजनीतिक, सांस्कृतिक परिस्थिती अवलंबून असते. त्या स्थितीचे सामायिक रूप म्हणजेच संस्कृती होय." विष्णू प्रभाकरांनी संस्कृतीचा केलेला सर्वांगीण विचार वाचकांना संस्कृती स्वरूपविषयक मूलभूत आकलन करून घेण्यास साहाय्यभूत ठरतो, हीच या विवेचनाची खरी देणगी होय. विष्णू प्रभाकर आपलं लेखन अधिक निर्दोष व सर्वग्राही करत असतात. त्यातून वाचकाची जाण प्रगल्भ व व्यापक होत राहते.

 संस्कृतीच्या विविध व्याख्यांचा परामर्श घेत विष्णू प्रभाकर संस्कृतीचा समाज, विज्ञान आणि संस्कारांशी असलेला अन्योन्य संबंध विशद करतात.

साहित्य आणि संस्कृती/१६७