Jump to content

पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 ‘संस्कृती माला' प्रकाशित करताना केवळ ग्रंथ परिचय व संस्कृती ओळख हा उद्देश होता. नंतर या सर्व ग्रंथ परिचय व भाषांतराचे संकलन करून त्याला ग्रंथ रूप देण्याची कल्पना पुढे आली. ती कल्पना पण ‘समाज प्रबोधन पत्रिका' त्रैमासिकाचे संपादक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांचीच. मी निमित्त मात्र म्हटले तरी ते अतिशयोक्त होऊ नये. या उपक्रमामुळे मी पूर्वी केव्हातरी अभ्यास, व्यासंग म्हणून वाचलेले ग्रंथ पुनः एकदा कोळून प्यालो. त्यामुळे फायदा असा झाला की माझे भारताविषयाचे इतिहास, संस्कृती, समाजरचना, वर्तमान परिवर्तन इत्यादी संदर्भातील आकलन विस्तारून अन्विती लावणे शक्य झाले. मी या वाचन, लेखन, भाषांतराने स्वतः समृद्ध झालो. याचे श्रेय ‘समाज प्रबोधन पत्रिका संपादकांनाच द्यावे लागेल.
 इकडे मी ‘समाज प्रबोधन पत्रिका' त्रैमासिकात संस्कृतीविषयक ग्रंथ परिचय व भाषांतरासंबंधी वाचन, लेखन, विचार करत होतो. त्याचवेळी त्याच काळात मी सन २०१५ मध्ये जानेवारी ते डिसेंबर असे अखंड बारा महिने, ‘आंतर भारती' हे भारतीय भाषा व साहित्याचा परिचय करून देणारे पाक्षिक सदर ‘दैनिक दिव्य मराठी' च्या 'रसिक' पुरवणीसाठी लिहीत होतो. भारतीय भाषा व साहित्य परिचयाद्वारे या देशात राष्ट्रीय एकात्मता कशी नांदते आहे, ते समजावित होतो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशास आपण राज्यघटना तयार करून प्रजासत्ताक राष्ट्र बनविले. ते करत असताना आपण भाषावार प्रांतरचना, राजभाषाविषयक धोरण ठरवले. भारतीय राजघटनेने हिंदी देशाची राजभाषा बनवून तिला भारतीय भाषांची संपर्कभाषा बनविले. मूळात ती राष्ट्रभाषाच बनायची, पण दक्षिण प्रांतीयांच्या विरोधामुळे ते घडू शकले नाही. तरी लोकव्यवहार, भाषांतर, सांस्कृतिक आदानप्रदान, भाषिक व साहित्यिक देवाण-घेवाण, चित्रपट, वहिन्या, वृत्तपत्रे सर्व तव्हेने ती लोकसिद्ध राष्ट्रभाषाच आहे. जगभरातील विविध देशात तिला भारताची प्रतिनिधी भाषा म्हणूनच ओळखले जाते. या अनुषंगाने केलेल्या अभ्यासातून भाषा, साहित्य व संस्कृतीविषयी मला एक विश्वभान आले.
 योहान वॉल्फगांग फॉन गटे (गोएथ) चा काळ इ. स. १७४३ ते १८३२ चा. तो जगप्रसिद्ध नाटककार, कवी, समीक्षक. त्याचे ‘फास्ट' हे महाकाव्यात्मक नाटक जगप्रसिद्ध आहे. त्याने त्या काळात विश्वसाहित्य (Weltliteratur) संकल्पना विशद केली होती. ती कल्पना वैश्विक संस्कृती निर्मिती आणि साहित्यिक एकतेचीच होती. आज आपण जे जागतिकीकरण