पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचा इतिहास, संस्कृतीचा व्यासंग सिद्ध करतो. हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान अशा बहधर्मीय संमिश्रणातून येथील जात व्यवस्था आकारली. तिला पूर्वीच्या वर्णाश्रम व वर्ग व्यवस्थेचा आधार आहे. येथील एकतेस धर्मपरायणतेचे बळ आहे. त्यामुळे भारत ही इतिहास काळापासून दार्शनिक ऐक्यभूमी बनली आहे. यात येथील सर्वधर्मीय व सर्वजातीय संतांच्या शिकवणुकीचा मोठा वाटा आहे. बौद्ध, शीख, पारशी, जैनादी धर्मांनी ही येथील समाजाला अखंड ठेवण्यास साहाय्य केले आहे, ते विसरता येणार नाही, असे जेव्हा जैनेंद्रकुमार सांगतात, तेव्हा त्यांची विचार व्यापकता व सर्वग्राही वृत्ती स्पष्ट होते.

जातीय राष्ट्रवाद आणि गांधी

 राष्ट्रीय काँग्रेसने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जे अहिंसक आंदोलन केले, त्यातून भारतास स्वातंत्र्य प्राप्त झाले. स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे झालेले विभाजन ही काही गांधीजींची पसंती नव्हती. पण इथल्या कट्टरपंथीयांना विभाजन हवे होते. विभाजनानंतर पाकिस्तानला पैसे देणे इथल्या कट्टरपंथियांना मुसलमानांचा अनुनय, तुष्टीकरण वाटणे व त्यासाठी महात्मा गांधींना जबाबदार धरणे व त्यातून त्यांची हत्या करणे यासारखे दुष्ट कर्म दुसरे नव्हते. जातीय राष्ट्रवादातून गांधीजींची झालेली हत्या व नथुराम गोडसेस हुतात्मा (?) ठरविण्याची कट्टरपंथियांची खेळी जैनेंद्रांना क्लेशकारक वाटली, तर आश्चर्य वाटायला नको. गांधी हत्येने भारतीय समाजाची मोठी हानी झाली. गांधींना मुसलमानांचा मित्र व हिंदूचा शत्रू ठरविण्याचे षड्यंत्र आजही थांबलेले नाही. जैनेंद्रांना याच गोष्टीचे भय होते. हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली इथे जातीय, धार्मिक विद्वेष सतत पसरविला गेला व जात आहे. सुडाची भावना ही विभाजनवादी वृत्ती होय, असे जैनेंद्र मानतात. काश्मीरच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे जैनेंद्रांना क्लेशदायी वाटते. भारतीय स्वातंत्र्यात महात्मा गांधींचे अमोघ योगदान स्पष्ट करताना जैनेंद्रांनी स्पष्ट केले आहे की, “गांधी इसलिए महात्मा के अतिरिक्त समाजशास्त्रियों और लोकनेताओं के लिए अध्ययन और अनुगमन के विषय हो जाते हैं कि नीति ही उन्होंने नहीं दी, बल्कि समग्र कार्यक्रम की एक संगत शृंखला भी दी। केवल नीति से नहीं चलता केवल शक्ति से भी नहीं चलता। तद्नुकूल व्यवस्थित कर्म भी चाहिए। ये तीनों आवश्यक तत्त्व गांधीजी से मिलते गये, इसका यह परिणाम हुआ कि अँग्रेजों के अवचेतन में और भारतवासियों के अवचेतन में भी कितना ही मैल चाहे पड़ा रहा हो, स्वराज्य के आगमन की विधि अभूतपूर्व रूप से सुंदर सद्भावमय रही।" (पृ. २५१). या शब्दातून जैनेंद्रांनी सर्व भारतीयांच्या कृतज्ञता भावनाच व्यक्त केल्या आहेत.

साहित्य आणि संस्कृती/१५५