पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वैशिष्ट्यांची चांगली जाण होती. ती ‘समय और हम' या ६६४ पानी महाग्रंथातून स्पष्ट होते.


रचना

 ‘समय और हम' हा जैनेंद्रांचा मानवी जीवनाच्या सर्वंकष प्रश्नांची उकल करणारा ग्रंथ होय, वीरेंद्र कुमार गुप्त यांनी सन १९६१ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर असे नऊ महिने रोज किमान चार तास जैनेंद्रांना बोलते करून, प्रश्न विचारून त्यांची मते अजमावली. या ग्रंथात सुमारे ४५० प्रश्नांची उत्तरे आहेत. तशा अर्थाने हा प्रश्नोत्तर शैलीत लिहिलेला तात्त्विक ग्रंथ होय. प्रश्नांचं पण एक वैशिष्ट्य असे की ते आयत्यावेळी सुचलेले असे असत. त्यांना विषय वर्गीकरणाची सीमा, चौकट असायची, पण पूर्वरचना नसायची. जैनेंद्र मुक्तपणे, विस्ताराने बोलत राहायचे. या सर्व प्रश्नोत्तरांना ग्रंथात चार खंडात विभाजित करण्यात आले आहे. १) परमात्म २) पश्चिम ३) भारत ४) अध्यात्म. पैकी या लेखात सांस्कृतिक अंगाने विचारलेल्या आणि ‘पश्चिम' व 'भारत' या दोन खंडातील प्रश्नोत्तरांचीच दखल घेण्यात आली आहे. सुमारे ४०० पृष्ठांत असलेली ही प्रश्नोत्तरे विषय वैविध्यांनी नटलेली आहेत. ‘पश्चिम' खंडात पराजित नारीत्व, राष्ट्रवाद, हिंसावादी संस्कृती, अर्थ, काम, भाव, साहित्य आणि कलाविषयक विविध प्रश्नांवर जैनेंद्राचे मुक्तचिंतन आपणास वाचावयास मिळते. तर ‘भारत' खंडात सांस्कृतिक व्यामिश्रता, गांधीवाद, लोकशाही, भाषिक प्रश्न, कामजीवन, औद्योगिक क्रांती, शिक्षण, साहित्य सारख्या विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. हे दोन्ही खंड विवेचनाच्या अंगांनी पाहिले तर तुलनात्मक होऊन गेले आहेत. युरोप आणि भारत म्हणजेच पूर्व-पश्चिमेची सांस्कृतिक प्रतीके. त्यातील फरक अधोरेखित करत जैनेंद्रकुमार भारतीय सांस्कृतिक समस्यांची चिकित्सा करत उकल करत राहतात. या सर्व उत्तरांवर गांधीवादी विचारधारेचा प्रभाव स्पष्ट आहे. हे जरुरी नाही की वाचक त्यांच्या विचारांशी सहमत असतील, होतील; पण एखाद्या प्रश्नाची सर्वांगीण चिकित्सा कशी होऊ शकते त्याचा वस्तुपाठ म्हणून ‘समय और हम' एकदा मुळातून वाचायलाच हवे.

प्रस्तावना/स्वीकृती

 ‘समय और हम' ला थोर गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांची प्रस्तावना आहे. त्यांना बाबा आमटेंच्या सोमनाथ येथील श्रम शिबिरात (१९६७-६८) मी तरुणपणी ऐकले आहे. जैनेंद्रकुमारांचाही सहवास लाभला व चर्चा करण्याचा योग सन १९७३ मध्ये आचार्यकुल परिषदेच्या निमित्ताने

साहित्य आणि संस्कृती/१४७