पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोरियाच्या सांस्कृतिक विकासावर चीनचा वरचष्मा राहिला आहे. पण अलीकडच्या काळात ती जागा बौद्ध धर्माने पटकावली आहे. जपानला बौद्ध धर्म पसरला तो कोरियामार्फतच. यू-देन-जी, ह्यो-कून जी या ठिकाणी डॉ. सांकृत्यायन यांना सन १९३७ मध्येही विहार, मठातून शेकडो भिक्खू आढळल्याची नोंद त्यांनी या भागात केली आहे. दुस-या महायुद्धानंतर कोरियाचे विभाजन झाले. जपान, अमेरिकेच्या संघर्षाच्या परिणामी कोरियाची मोठी पडझड झाली. तरी गौतम बुद्धाच्या अनेक प्रतिमा जागोजागी दिसून येतात.

 सातव्या शतकात जपानमध्ये शोतोकू गादीवर असताना त्याने बौद्ध धर्म राजधर्म म्हणून घोषित केला. तेव्हापासून तो आजअखेर तिथल्या लोकसंस्कृतीचे अभिन्न अंग बनून राहिला आहे. तो इतका की जपानी वास्तुरचना नि विहार, मठ रचनेत फरक शोधणे अवघड होऊन जाते. जपानी नागरिक तंत्रज्ञानात इतके पुढे पण तिथल्या बौद्ध मंदिरापुढील झाडांना नवसाच्या इच्छा व्यक्त करणाच्या शेकडो चिठ्या आजही आढळतात. अंगारे, धुपारे सर्रास दिसतात. नाराचा दाईबुत्स (महाबुद्ध), किंकाकुजीचा सुवर्ण बुद्ध पाहात असताना लक्षात येतं की बृहत्काय बुद्ध प्रतिमा उभारण्यातून जपानी आपली असीम भक्तीच व्यक्त करीत असतात. डॉ. सांकृत्यायन या प्रतिमांची लांबी, रुंदी, उंची- तीही अवयवागणिक सांगून (कान, नाक, डोळे, बोटे इ.) आपले सूक्ष्म निरीक्षण, अभ्यास नोंदवतात (पृ. ४८२ पहा). क्योटो, हायेई, जेन संप्रदाय, शिंग-गोन संप्रदायादींचे तपशील बौद्ध धर्माविषयीची आस्था जागवणारे आहेत. डॉ. सांकृत्यायनांचा जपानमधील बौद्ध धर्माचा अस्तित्व सातत्याबद्दलचा अभिप्राय फारच बोलका आहे. “जापानी साम्राज्यवाद जब अपने चरम उत्कर्ष पर था, तो बौद्ध-महंथो (भिक्खुओं) ने भी बहती गंगा में हाथ धोनेकी कोशिश की, किंतु बौद्ध धर्म अपने करोडपति महंथों तक सीमित नहीं था, इसलिए कोई आश्चर्य नहीं यदि भीषण पराजय के बाद वह फिर सम्हल गया।" (पृ. ४९४) अशा अभिप्रायांमुळे ‘बौद्ध संस्कृति' ग्रंथ केवळ धर्मप्रसाराचा वृत्तांत न राहता तो या धर्माचा चिकित्सक अभ्यास ग्रंथ बनतो.

तिबेट आणि मंगोलिया

 हा या ग्रंथाचा शेवटचा भाग. या भागात डॉ. राहुल सांकृत्यायन यांनी बौद्ध धर्म, संस्कृती आपल्या प्रचार प्रसाराच्या अंतिम वैश्विक टप्प्यात असतानाही किती चिवटपणे पाय पसरत राहिली, भिखूनी आपल्या जिवाचं

साहित्य आणि संस्कृती/१४२