पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गौरविले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट बहाल केली होती. साहित्य अकादमीने त्यांच्या मध्य एशिया का इतिहास भाग १, २ ग्रंथास सन १९५८ चा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

 डॉ. राहुल सांकृत्यायन यांनी बौद्ध धर्मासंबंधी हिंदीत विपुल लेखन केले. इतिहास, तत्त्वज्ञान, संस्कृती चरित्र शाखांत मौलिक व भाषांतरित ग्रंथांचे योगदान दिले. 'बुद्धचर्या' (१९३०), ‘धम्मपद' (१९३३), 'मज्झिमनिकाय' (१९३३), ‘विनयपिटक' (१९३४), ‘दीघनिकाय' (१९३५) या मौलिक बौद्ध ग्रंथांची हिंदी भाषांतरे त्यांची पाली, प्राकृत भाषांवरील अधिकाराची प्रचिती देतात. ‘बौद्ध दर्शन' (१९४२) ग्रंथ डॉ. सांकृत्यायन यांचा बौद्ध तत्त्वज्ञानाचा व्यासंग सिद्ध करतो. इतिहासावरील त्यांच्या हुकमतीची प्रचिती ‘तिब्बत में बौद्ध धर्म' (१९३५), ‘मध्य एशिया का इतिहास भाग १,२' (१९५२) सारखे ग्रंथ देतात. ‘महामानव बुद्ध' (१९५६) हे गौतम बुद्धाचे चरित्र लिहून डॉ. सांकृत्यायन यांनी गौतम बुद्धाबद्दलची आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. पण या सर्वापेक्षा हिंदी साहित्य डॉ. राहुल सांकृत्यायन यांचे ऋणी आहे, ते त्यांच्या ‘बौद्ध संस्कृति' (१९५२) या पावणे सहाशे पृष्ठांच्या ग्रंथराजमुळे.

बौद्ध संस्कृती

 ‘बौद्ध संस्कृति' हा ग्रंथ डॉ. राहुल सांकृत्यायन यांच्या ३७ वर्षांच्या निरंतर प्रवासाचे फलित होय. सत्तर वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. सांकृत्यायनांनी आपलं निम्म्याहून अधिक आयुष्य प्रवासात खर्ची घातले. पुढे त्यातून त्यांनी ‘घुमक्कड शास्त्र' (१९४९) च विकसित केले. बौद्ध धर्माचा प्रसार ज्या ज्या देशात झाला, तिथे ते गेले. पाहिलं आणि मग लिहिले. म्हणून या पुस्तकास ‘चक्षुर्वैसत्यम्'चे अधिष्ठान लाभले आहे. सदर ग्रंथाचे महत्त्व त्या अंगानेही अधोरेखित होत रहाते. वाचक स्वतःच देशाप्रदेशातून फिरत बौद्ध धर्माचा उगम, विकास, प्रसार, प्रचार आणि व्हासही पाहतो, अनुभवतो. ही वाचकाच्या दृष्टीने प्रचित-पर्वणी! भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार झाला तो बौद्ध धर्माच्या माध्यमातून, हे सदरचा ग्रंथ वाचताना लक्षात येते. प्राचीन भारतीय संस्कृती कर्मठ नि कर्मकांडकेंद्री होती. बौद्ध धर्म त्याची प्रतिक्रिया म्हणून अस्तित्वात आला होता. या धर्माची लोकानुवर्ती कार्यपद्धती, समानता, लोकभाषी वृत्ती, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय' दृष्टीमुळे हा धर्म जगभरात पसरला. त्याच्या तत्त्वज्ञानाची उपयुक्तता स्पष्ट करताना ‘प्राक्कथन' (प्रस्तावना) मध्ये डॉ. सांकृत्यायनांनी म्हटले आहे की

साहित्य आणि संस्कृती/१३६