पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘बौद्ध संस्कृती' : बौद्ध धर्म प्रसाराचा इतिहास


डॉ. राहुल सांकृत्यायनांचे पांडित्य

 ‘महापंडित', 'महामानव', 'त्रिपिटकाचार्य' अशा त्रिविध उपाध्यांनी भारतीय साहित्यात ज्यांना ओळखले जाते ते डॉ. राहुल सांकृत्यायन (१८९३१९६३) हे हिंदीतील श्रेष्ठ साहित्यकार होत. धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुरातत्त्व, समाजशास्त्र, प्राच्यविद्या, व्याकरण, संस्कृती, भाषा, साहित्यकोश, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, कथा, कादंबरी, भाषांतर, प्रवासवर्णन, नाटक असे वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केले. त्यांनी सुमारे १५० हिंदी पुस्तके लिहिली. हिंदीशिवाय उर्दू, संस्कृत, प्राकृत, पाली, अपभ्रंश, इंग्रजी, अरबी, फारसी, फ्रेंच, तामिळ, कन्नड, चिनी, तिबेटी, रशियन भाषांचे ते जाणकार होते. प्रवासी भारतीय' म्हणून त्यांचा असलेला लौकिक जगप्रसिद्ध होता. श्रीलंका, नेपाळ, तिबेट, सिक्कीम, इंग्लंड, युरोपमधील अन्य अनेक देश, आशिया खंडातील ब्रह्मदेश, थायलंड, जपान, कोरिया, इराण, रशिया या देशांच्या प्रवासांनी त्यांनी तो लौकिक सिद्ध केला होता. त्यांच्या विदेश वाच्या पाहता लक्षात येते की बौद्ध धर्माचा जिथे जिथे प्रचार, प्रसार झाला, तिथे ते जाऊन आले. नुसते जाऊन नाही आले, तर तेथील बौद्ध विहार, स्तूप, मठ, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, मंदिरे, मशिदी, चर्च पाहिली, अभ्यासली. तेथील बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास केला. हजारो पृष्ठांची सामग्री त्यांनी फोटोप्रती करून आणली. बौद्ध धर्म नि संस्कृतीसंबंधी जे संस्कृत ग्रंथ इथल्या विदेशी आक्रमणात नष्ट झाले होते ते आणले. त्यात तिबेटी ग्रंथ ‘कंजूर' (११०८ ग्रंथ) व ‘तंजूर' (३४५८ ग्रंथ) यांचा समावेश आहे. ते आणून थांबले असते तर सांकृत्यायन कसले? लिप्यांतरण करून, भाषांतर करून ते प्रसिद्ध केले. बौद्ध धर्मासाठी त्यांनी आयुष्य पणाला लावले. भारत सरकारने त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून ‘पद्मभूषण' देऊन

साहित्य आणि संस्कृती/१३५