इतिहासाची पाने उलटताना हे लक्षात येते की, जेव्हा जेव्हा देशात निरंकुश सत्ता अस्तित्वात येते, तेव्हा एक तर ती भ्रष्ट होत असते किंवा हुकूमशाही प्रवृत्तीने मनमानी कारभार सुरू होऊन एककल्ली निर्णय व अंमलबजावणीचे सत्र सुरू होते. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, जाती-धर्मानिरपेक्षता लोकशाही मूल्ये धोक्यात येतात. परिणामी सामान्यांचे जिणे जिकिरीचे होते.
वरील घटनेची प्रतिक्रिया म्हणून देशभराच्या बुद्धिजीवी वर्गात अस्वस्थतेचे वातावरण पसरणे स्वाभाविक होते.या दरम्यान काही निमित्ताने मी समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक प्रा. डॉ. अशोक चौसाळकरांना भेटण्यास गेलो होतो. जानेवारी, २०१५ चा सुमार असावा. या विषयावर चर्चा होत असताना हिंदी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या संस्कृति के चार अध्याय या साहित्यकृतीस सन १९६० ला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला होता. त्यास भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना लाभली आहे. तो ग्रंथ सध्याच्या असहिष्णू वातावरणात वाचला गेला पाहिजे, अशी चर्चा उभयतांत झाली. त्याची सुवर्ण जयंतीही नुकतीच साजरी झाली होती. यावर लिहिलं गेलं पाहिजे ही मूळ कल्पना डॉ. चौसाळकर यांची. मग मी असे अनेक ग्रंथ हिंदीत असल्याची पुस्ती जोडली. त्यातून ‘संस्कृती' विषयावर हिंदीत लिहिल्या गेलेल्या ग्रंथांचा ‘समाज प्रबोधन पत्रिकेतून' परिचय करून देणारी माला सुरू करण्याचे उभयपक्षी मान्य होऊन मी लिहिण्यास संमती दिली. लगेचच एप्रिल-जून २०१५ च्या अंकात ‘संस्कृति के चार अध्याय : सामायिक संस्कृतीचे स्वप्न आणि सत्य' शीर्षक लेख प्रसिद्ध झाला. वाचकांनी त्याचे चांगले स्वागत केले. अपवाद मतांतरही झाले.
दुसरा अंक प्रकाशित होण्याच्या दरम्यान असहिष्णुता रेखांकित करणारी आणखी एक घटना घडली. सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१५ च्या सुमारास उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध जिल्ह्यातील दादरी गावी गोमांस भक्षण साठवण करण्याच्या संशयावरून काही हिंदुत्त्वावादी कार्यकर्त्यांनी एक मुस्लीम कुटुंबाला मारहाण केली. त्याचे पर्यावसान पुढे सामुदायिक हल्ल्यात झाले. प्रत्यक्षात असे काही गोमांस भक्षण व साठवण झाले नसल्याचे नंतर झालेल्या चौकशीत उघडकीस आले. पण दरम्यान केवळ वहिमापोटी एक कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले.याची प्रतिक्रिया म्हणून देशभर नव्याने सत्तेवर आलेले सरकार धार्मिक असहिष्णू असल्याचा संदेश सर्वत्र पोहोचला व देशाच्या बहुसांस्कृतिक, बहुजातीय, बहुधर्मीय, बहुभाषी संस्कृतीची एकात्मतेची परंपरा अखंड राखावी अशी अपेक्षा सर्व थरांतून व्यक्त होऊ लागली. त्यातूनही ‘संस्कृती' विषयावर
पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/13
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.