पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माथेफिरू समजल्या गेलेल्या मुहम्मद तुघलकाच्या कार्यकालात सन १३४० मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. सतत सात वर्षे पावसाळा कोरडा गेला. दिल्लीच्या या वेड्या समजल्या जाणा-या सुलतानाने सहा महिने पुरेल इतक्या धान्याची तजवीज जनतेसाठी केली होती. त्याच्या जेव्हा हे लक्षात आले की दुष्काळाच्या झळा काही केल्या कमी होत नाहीत, तेव्हा त्याने अयोध्येच्या जवळील कोरा इथे एक नवे नगरच उभारले नि तिथे दिल्लीतील दुष्काळग्रस्तांसाठी छावणी चालवली. ती पण एक दोन नव्हे चांगली सहा वर्षे.

 असे का झाले? तर सुलतानानी साम्राज्य विस्तार तर केला पण सुखसोयींकडे आवश्यक ते लक्ष दिले नाही. रस्ते नव्हते. मंदिर, मशिदी उभारल्या पण रस्त्यांचे जाळे नाही विणलं.

 असं असलं तरी व्यापार, उलाढाली होत राहायच्या. विशेषतः अमीर, उमराव, सरदारांना लागणाच्या चीजवस्तूंचा व्यापार व्हायचा. अशा वस्तूंची निर्यात व्हायची. विदेशी निर्यात होणा-या वस्तुंचा तुटवडा असायचा. त्या वस्तू महाग विकल्या जात. चीन, मलाया, अरबस्तान, युरोपात समुद्रमार्गे व्यापार चालायचा. त्या काळात कालिकत आणि भडोच ही बंदरे प्रमुख होती. मध्य आशिया, इराण, भूतानशी रस्त्याच्या मार्गाने व्यापार होत असे. मसाल्याचे पदार्थ, कपडे, धान्य, अफूची निर्यात व्हायची. बदल्यात सोने आयात व्हायचे.


सामाजिक स्थिती


 हिंदूच्या सामाजिक जीवनास उतरती कळा आली होती. मुसलमान साम्राज्यात हिंदूचा दर्जा दुय्यम नागरिकाचा होता. दिल्ली सुलतानाच्या दरबारात हिंदूना तुच्छतेने वागवले जायचे. अल्लाउद्दीन खिलजीने तर आपल्या आमदनीत त्यांना हीन-दीन बनवण्याचा विडाच उचललेला होता. त्याने हिंदूवर अनेक जुलमी कर लादले होते.

 दिल्लीत मुसलमानी अमलात गुलाम प्रथा जोरदार होती. विदेशातून गुलामांची आयात केली जायची. गुलामात भारतीयांचाही भरणा असायचा. अमीर, उमराव, सरदारांना गुलाम बाळगायचा नाद होता. या गुलामांकडून सैन्य सेवा, राज सेवा, व्यक्तिगत सेवा करून घेतली जायची. ज्या गुलामांमध्ये प्रतिभा, चुणूक दिसायची त्यांना गुलामीतून मुक्त करून उच्च पदांवर नियुक्त

साहित्य आणि संस्कृती/१२७