पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
आर्थिक, सामाजिक स्थिती


 हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की युद्ध-व्यवसायी जातींसाठी युद्ध अनिवार्य असते, कारण तो त्यांच्या जगण्याचे साधन असते. त्यामुळे ते भांडण्याचे कारण मिळाले नाही तर कुरापती काढते. मग राज्यविस्ताराचे कारण काढून वैर, शत्रुत्व, संघर्षात गुंतून राहणे हा एक प्रकारे त्यांचा जीवनक्रम बनून गेलेला होता. विशेषतः हे तेव्हा घडायचे जेव्हा राज्यकारभार क्षत्रिय पाहात असायचे नि जनता निद्रिस्त असायची.

 हूण, मंगोल, मराठे इत्यादी युद्धखोर जातीत लूट करून सेनेचा खर्च भागविण्याची वृत्ती दिसून येत असे. अशा काळात साहसी, वीर लोक पैशाच्या प्रलोभनाने सैन्यात भरती व्हायचे. दिल्लीचे तख्त चालविणा-या काळात म्हणजे जेव्हा देशभर केंद्रीय सत्ता असायची अशा वेळी स्वतंत्र संस्थाने, राज्ये जिंकून लुटीद्वारे सेनेचा उदरनिर्वाह करण्याची वृत्ती असायची. जेव्हा दिल्लीवर पठाणांचे राज्य होते तेव्हा त्यांनी आर्थिक सुधारणांकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते.

 आणि दुसरीकडे पठाणांनी आर्थिक व्यवस्थेत हस्तक्षेप केला असे दिसत नाही. व्यवसायी व व्यापारी यांच्या संघटना होत्या. कारागीर आपल्यावर सोपवलेलं काम करत राहायचे. एक गोष्ट मात्र होती. सैनिक आणि सरदारांच्या वस्त्र नि शस्त्रांच्या गरजा असायच्या. त्यामुळे दिल्लीच्या सुलतानांनी त्यांचे कारखाने सुरू केले होते. दिल्ली दरबारामार्फत सुरू असलेल्या रेशमी कापडाच्या कारखान्यात त्या वेळी ४००० विणकर काम करत असायचे. हे रेशमी कापड दरबारातील अभिजनांसाठी निर्मिले जायचे. लोकरी व साधे कापड विणणारे कारखाने सरकारी असायचे. अन्य अनेक वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने पण सरकारीच असायचे. परंतु यांचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत नसायचा. शिल्पकार, कलाकारांच्या वस्तू उत्पादनांचेही कारखाने होते. ते लोकांच्या गरजा भागवण्याचे कार्य आपापल्या परीने, पद्धतीने करत रहायचे.

 सततच्या युद्धांमुळे शेतक-यास शांत डोक्याने आणि निश्चिंततेने शेती करणे कठीण होऊन बसले होते. देशात कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. सर्वत्र अंधाधुंदीचा कारभार होता. त्याचाही प्रतिकूल परिणाम शेतीवर व्हायचा. परिणामतः जलालुद्दीन खिलजी नि मुहम्मद तुघलकाच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता. पुन्हा त्याचा सर्वाधिक फटका शेतक-यांनाच बसला.

साहित्य आणि संस्कृती/१२६