पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशांमधून साधू-संत जन्माला आले. परिणामतः दक्षिण भारतातील सर्वसामान्य भक्तांना समाजाकडून मोठा त्रास सहन करावा लागला. हे सर्व साधु-संत मानव-धर्मावर विश्वास ठेवणारे होते. त्यांना याद्वारे जगातील सर्व मानवांत एकता आणि बंधुभाव निर्माण करायचा होता. म्हणून तर कबीराने पंडित आणि मौलवी दोघांना फटकारले होते. त्यांनी या दोघांच्याही अंधविश्वासावर प्रहार केला होता. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की हा विचार समाजाच्या निम्न समजल्या जाणाच्या वर्ग, वर्ण नि जातीतून आलेला होता. हा समाज हिंदू नि मुसलमान दोन्ही धर्मातील तळागाळाचा होता, हे विशेष. तसं पाहिलं तर बौद्ध आणि जैन धर्मीयांनी, त्यांच्या साधु-संतांनी प्राचीन काळापासूनच शील, सदाचार, प्रेम, करुणा इत्यादीवर भर दिलेला होता. ते यापूर्वीच जातिभेदाचा विरोध करत आले होते. परंतु नव्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मागासवर्गीय संतांच्या विचार नि आवाहनांना असाधारण महत्त्व होतं. नाथ संप्रदायांनी अकराव्या शतकातच उत्तर-पश्चिम भारतात अशा विचारांचा श्रीगणेशा केलेला होता. दक्षिण आणि उत्तर भारतातील निर्गुण उपासक असाच प्रचार, प्रसार करत आले होते. दक्षिण भारतात लिंगायत, महाराष्ट्रात महानुभाव पंथीयांनी अशीच धर्मनीती अवलंबिली होती. या उदारवादी नि व्यापक विचारधारांचा विरोध ब्राह्मणशाहीकडून मोठ्या प्रमाणात झाला होता.

 जेव्हा धर्म आणि ईश्वराच्या नावावर समाजात परस्परविरोधी प्रचार होत राहायचा, तेव्हा धर्म आणि ईश्वराच्याच नावावर मानवी एकता, प्रेम, सामंजस्याचा प्रचार शक्य होता. यात काहीच आश्चर्य नव्हते की त्या काळी अनेक हिंदू सूफी झाले होते नि अनेक मुसलमान कृष्णभक्त! अगणित मुसलमान आणि अस्पृश्य नानक नि कबीरांचे अनुयायी होते. राजा भर्तृहरीची गीते गात कितीतरी मुस्लिम फकीर त्या काळी भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

 चौदाव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात हिंदू-मुस्लीम मैत्री नि एकतेच्या वातावरणात अनेक प्रांतीय संस्थानांतून, राजवटींतून परस्पर विश्वास निर्माण झाला होता. परिणामी एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजल्या जाणाच्या वर्गातूनही आत्मीयतेचे दर्शन घडायचे. यात अविश्वसनीय असे काहीच नव्हते. उलटपक्षी तो त्या काळचा रिवाज बनून गेला होता, असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये नि आश्चर्यही!

 आज भारतात राजकीय स्वार्थापोटी जातीयवाद, प्रांतवाद डोके वर

साहित्य आणि संस्कृती/१२३