पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 परंतु येथील वातावरणाने त्यांना बदलले. त्यांनी येथील अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप नाही केला. शेती व अन्य जीवनावश्यक वस्तूंसाठी ते भारतीयांवर अवलंबून होते. भारतीय जनतेतील काही लोक आपले असणे ही त्यांची अनिवार्य गरज होती. म्हणून त्यांचे धर्मप्रसारक शूद्रवर्णीयांना धर्मांतराने मुसलमान करीत. दुसरीकडे अभिजन वर्गातील हिंदू भीती व स्वार्थापोटी इस्लाम धर्म स्वीकारत.

 प्रारंभी मुस्लीम शासक विदेशी होते, पण त्यांच्यात भारतीय मिसळत राहिले. विदेशी आक्रमक भीती व धाकदपटशा दाखवूनच सभ्य व स्वाभिमानी जातींवर राज्य करत रहायचे. परिणामतः त्यांच्या नृशंसतेच्या नि अनन्वित अत्याचारांच्या आठवणी हिंदूना विसरणे अशक्यप्राय होऊन गेले होते. परंतु पुढे हळूहळू धर्माभिमानी हिंदू संपर्काने त्यांना ओळखून होते. मुस्लीम शासकांचे नि त्यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले; तसेच भारतीय भाव नि विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडू लागला. अशा प्रकारे मुस्लीम शासक वर्गात दोन प्रवृत्ती दिसू लागल्या. एक संकुचित तर दुसरी उदारवादी. या दोन भिन्न प्रवृत्तीत मतैक्य अशक्य होते.

 हिंदू सामंती सभ्यतेतही या दोन प्रवृत्ती प्रकट झाल्या. पैकी एक प्रवृत्ती भारतीय धर्माच्या नावावर रूढी व जातीय संकुचित दृष्टिकोनासच धर्म मानत विकसित होत राहिली तर दुसरीकडे या विरुद्धची वृत्ती मानवासाठी सामान्य धर्म शोधत राहिली. तिने हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-शूद्र, अशा सर्व प्रकारच्या भेदभावांना मूठमाती देत, ईश्वर भक्तीत लीन राहात मानवधर्म स्थापनेचे प्रयत्न केले.

 अशा मानव धर्माचे समर्थक समाजातील मागासवर्गीय होते. त्यांच्यात हिंदू व मुस्लीम गरीबांचा समावेश होता. निर्गुण उपासक संत आणि सूफीसाधक याच विचाराचे होते.

 याच्याविरुद्ध ब्राह्मण प्रभावाचा आग्रही, कर्मकांडप्रधान व जातीधर्म समर्थक हिंदू धर्म दिवसेंदिवस कट्टर होत गेला. वेदान्त आणि ईश्वरीय सत्ता प्रमाण मानणाच्या ब्राह्मण वर्गासाठी जाती-उपजातीचे नियम ब्रह्मवाक्य होते. दक्षिण भारतात हिंदू हे सामन्त आणि शासक असल्यामुळे ब्राह्मणांचे फावले. परिणामस्वरूप तिथे कट्टरतेस टोक आले.

 आज दक्षिण भारतात ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसा तो प्राचीन प्रश्न होय, परंतु मध्ययुगात त्यास टोक आले. या प्रश्नाचा शोध घेताना लक्षात येते की ज्या जाती वा वर्ण शूद्र समजले जातात,

साहित्य आणि संस्कृती/१२२