पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जेव्हा तुर्क मुसलमान झाले तेव्हा तर त्यांना ही संकुचित वृत्ती सोयीचीच ठरली. मुस्लीम धर्मगुरुंचा प्रभावच असा होता की ही वृत्ती दृढ व्हायला वेळ लागला नाही. मग तर तुर्क जातींना आपल्या पूर्वापार रक्तपिपासू वृत्तीस धार्मिक अधिष्ठानच प्राप्त झालं. राजनैतिक, आर्थिक स्वार्थसिद्धीसाठी धार्मिक उन्माद साधनच बनून गेलं. मुल्ला-मौलवींची चलती अस्तित्वात आली. लुटेरे धर्मयोद्धे समजले जाऊ लागले. जे लुटेरेपण भारताने शक, हुणांसारख्या विदेशी जातीत अनुभवले होते, तेच त्यापेक्षा भयंकर रूपात त्यांच्याच उत्तर पिढ्यांत अनुभवायला मिळाले. हे तुर्क तेच होते ज्यांनी ज्या मानव जातींनी पूर्व आशियात हिंसक आक्रमण, हत्यासत्र अवलंबत पूर्व युरोपीय मैदानी प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या.

 मंदिर आणि मूर्त्या उद्ध्वस्त करणारे हे रक्तपिपासू राजनैतिक, स्वार्थार्थ धर्माच्या नावावर आपल्या अनुयायांना प्रोत्साहन देत होते. जर त्यांनी लूट केली नसती तर आपल्या सैनिकांना ते वेतन देऊ शकले नसते. शिवाय सैन्याचा खर्च चालवणे त्यांना कठीण होऊन गेले असते. पैशाच्या तजविजीसाठी धर्म अनिवार्य बनून गेला होता. युद्ध व्यवसाय झाला होता. रजपूत, क्षत्रियांची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती.

 अतिप्राचीन काळापासून भारतात युद्ध करणाच्या जाती नि त्यांचे समर्थन आणि पोषण करणाच्या पुरोहित जाती अस्तित्वात होत्या. म्हणून एकीकडे सतत लढाया होत राहायच्या. कोणतीही केंद्रीय सत्ता अधिक काळ राज्य करू शकायची नाही. तर दुसरीकडे पुरोहित वर्ग आपल्या धार्मिक विधींच्या माध्यमातून युद्ध व्यवसायींना प्रोत्साहन देत राहायची. भारत सुसभ्य नि सुसंस्कृत देश असल्यामुळेच त्यांनी धर्मयुद्धा आणि धर्म-नियम, युद्धकैद्यांशी अपेक्षित मानवी वागणूक, शत्रूशी केला जाणारा सद्भावनापूर्ण व्यवहार, तसेच दया, क्षमा आणि करुणेसंबंधी असलेले सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय महत्त्व विशद केले आहे.

 असे असले, तरी भारतात पहिल्यापासूनच एका मोठ्या युद्ध व्यवसायी जातीच्या (क्षत्रिय) प्राबल्यामुळे लढाया होतच राहिल्या. त्यामुळे जनमानसात असा समज दृढ झाला होता की लढाईत मृत्युमुखी पडले की स्वर्गप्राप्ती होते. फरक इतकाच होता की क्षत्रियांना अशा अर्धसभ्य, रक्तपिपासू युद्ध व्यवसायी जातींना तोंड द्यावे लागे की ज्यांची युद्ध पद्धती सर्वथा भिन्न होती. ते भय पसरवत, अराजकता निर्माण करत, आपल्या नृसंशतेचा धाक घालत आणि धर्माचा पुकारा करीत युद्धाच्या मैदानात उतरत. ते विदेशी होते. इथे ते नवेच होते. दहशत पसरवणे हेच त्यांचे प्रमुख तंत्र नि अस्त्र होते.

साहित्य आणि संस्कृती/१२१