मनोगत
एकात्म भारताचे स्वप्न
सन २०१४ मध्ये संपन्न झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत गेली दहा वर्षे कार्यरत असलेले केंद्र सरकार ज्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे होते, त्या आघाडीचा पराभव झाला. लोकसभेत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणा-या डॉ. मनमोहन सिंगांच्या सरकारने राजीनामा दिला. त्याजागी मे, २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रीय सत्तेत बहुमत मिळविले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे आजवर प्रतिगामी म्हणून दुर्लक्षिलेल्या विचार संघटनांमध्ये उत्साह संचारला. त्या उत्साहाच्या भरात हिंदू-मुस्लीम व देशाच्या बहुसांस्कृतिक ओळखीस तडे जाणाच्या घटना एकामागून एक घडत गेल्या.
तमिळ कादंबरीकार पेरूमल मुरूगन यांनी सन २०१० मध्ये लिहिलेल्या ‘मधोरूबागन' कांदबरीचे इंग्रजी भाषांतर ‘वन पार्ट वुमन' शीर्षकाने इंग्रजीत प्रकाशित झाले. त्याची चर्चा देशभर होऊ लागल्यावर आमच्या हिंदू रूढी, परंपरांवर हा हल्ला मानून प्रतिगामी शक्तींनी रान उठवले. पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आली. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. या सर्व प्रकारांनी दुखावलेल्या मा. पेरूमल मुरूगन यांनी डिसेंबर २०१४/जानेवारी २०१५ च्या दरम्यान आपल्या लेखकाची आपण आत्महत्या केल्याचे फेसबुकवर जाहीर केले. याची प्रतिक्रिया जगभर उमटली. पुढे मद्रास उच्च न्यायालयाने आविष्कार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करून पेरूमल मुरूगन यांना निर्दोष मुक्त केले व पुस्तकावरील बंदी उठवण्यात आली. यापूर्वीही पण भारतात पुस्तकांवर बंदी आणण्याच्या घटना अनेक घडलेल्या होत्या. त्या वेळीही अशी प्रकरणे अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली होती. सन १९७४ ते १९७७ काळात देशात जाहीर झालेल्या आणिबाणीच्या काळात तर मुख्य मुद्दा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच होऊन बसला होता. जगात