पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असला तरी तो मुळात तक्षक जातीय हिंदूच होता. मुस्लीम आमदनीच्या शेवटच्या कालखंडात ज्याने बहामनी राज्याची मुहूर्तमेढ रोवली तो हसन गंगू हिंदूचा मुसलमान झालेलाच होता. दुस-या शब्दात सांगायचे झाले तर मुस्लीम प्रशासनात भारतीयांचा दबदबा होता.

 दिल्लीच्या पठाणी साम्राज्यात हुद्देदार मुसलमान असले, तरी हिंदूच्याशिवाय त्यांचं पान हलायचे नाही. हाताखालचे अधिकारी आणि कर्मचारी हिंदूच असायचे. अशा हिंदू कर्मचा-यांकरवीच ते शेतसारा व राज्याचा महसूल ते गोळा करीत. यातूनच हिंदू-मुसलमानांत परस्पर संपर्क येत राहायचा. कालांतराने हे संबंध घनिष्ठ झाले.
 चौदाव्या शतकाच्या अंतिम दशकात ज्या मुस्लीम राज्यांचा उदय झाला, त्यात तर हिंदू-मुसलमान एकमेकांच्या आणखी जवळ आले. मुस्लीम साम्राज्यात उच्च पदांवर तर हिंदू अधिकारी असतच, पण अंमलबजावणीच्या पातळीवरील सर्व कामे हिंदूंकरवीच होत रहायची. माळव्याच्या सुलतानाने चंदेरीचा राजा मेदिनी रायला नि त्यांच्या मित्रांना महत्त्वाचे अधिकार दिले होते. बंगालचा सुलतान हुसेन शहाने तर अनेक हिंदू अधिका-यांवर राज्य चालविण्याची जबाबदारी सोपवलेली होती. अशा उच्चपदस्थांत सनातन, पुरंदर, रूप नामक व्यक्तींचा भरणा अधिक होता.

 मुस्लीम शासक हिंदूची मंदिरे आणि समाध्यांना दान द्यायचे. बिहारच्या मुहम्मद शहा नामक जहागीरदाराने आपल्या जहागिरीतील मोठा हिस्सा बौद्ध गयेतील मंदिरांना दिला होता. काश्मीरचा सुलतान जैनुलाबदीन शारदादेवी आणि अमरनाथ मंदिराच्या दर्शनासाठी नित्यनियमाने जात राहायचा. त्यांनी भक्तांसाठी धर्मशाळा बांधल्या होत्या. मोहम्मद तुघलकसारखा सुलतानही आपल्या सुप्त आकांक्षापूर्तीच्या हेतूने अनेक हिंदू योगी आणि साधूकडे आशीर्वाद घ्यायला जायचा. रजपुतांचे अनुकरण करत मुसलमानांनी ‘जोहर प्रथा अंगीकारल्याचे उल्लेख इतिहासात दिसून येतात. तैमूरलंगाचे सैन्य आपला किल्ला नष्ट करणार या शंकेने भटनेरचा मुस्लीम शासक कमालुद्दीन व त्याच्या अनुयायांच्या सौभाग्यवतींनी जोहर प्रथा पाळल्याचे (चितेत आत्माहती) दिल्याचे उल्लेख वाचायला मिळतात. ते सुभेदार मात्र तैमूरलंगाशी दोन हात करत युद्धात कामी आले. त्या काळातली हिंदू पगडी मुसलमानांत प्रिय होती. मुस्लीम स्त्रियांत बांगड्या भरायची प्रथा रूढ होती. इतकेच नव्हे, तर हिंदू नगरिक मुस्लीम पोषाख वापरत.

साहित्य आणि संस्कृती/११८